उत्तर गोवा
पर्वरी उड्डाण पुलाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. ऑगस्ट महिन्यापासून जुना बाजार जंक्शन आणि तीन बिल्डिंग जंक्शन येथून या पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली. उड्डाण पुलाच्या पूर्णतेनंतर पर्वरीतील वाहन वाहतुकीचा प्रश्न सुटेल. मात्र तोपर्यंत वाहनस्वारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे आणि आतापासूनच या मार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
५.६ किलोमीटर अंतराच्या या उड्डाण पुलाचा आराखडा अनेक वर्षांपूर्वी तयार झाला होता. मात्र राज्य सरकारकडून त्यास वेळीच चालना दिली गेली नाही. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने संपादित केलेल्या सरकारी जागेवर अतिक्रमणे वाढली. या अतिक्रमणांमुळे आराखड्यात आवश्यक बदल करण्यात आला व त्यानुसार पुलाचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील हा पूल अस्तित्वात आणण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणकर्त्यांना पाठिंबा दिला. शेवटी ही अतिक्रमणे देखील कायदेशीर झाली आणि उड्डाणपूल मार्गी लागण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे होणाऱ्या वाहन वाहतुकीच्या प्रश्नाबरोबरच आता वडाकडे येथील खाप्रेश्वर देवस्थानच्या वडाच्या झाडाच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. पुलामुळे जुनाट आणि भावनिक श्रद्धास्थान असलेला असा हा वृक्ष कापावा लागणार आहे. त्यामुळे देवस्थान समिती व स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींनी वृक्ष तो हटवण्यास हरकत घेतली आहे.
पत्रादेवी ते काणकोणपर्यंतच्या महामार्गच्या रुंदीकरणावेळी या पट्ट्यातील अनेक जुनाट झाडे सरकारने कापली. ही झाडे कापली जाऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमींनी अनेक प्रकारे आंदोलने केली. मात्र तरीही विकासाच्या नावाखाली ती झाडे कापली गेली. ‘आम्यानी’ कोलवाळ येथील आब्यांची झाडे कापली. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. हे आंदोलन म्हापशातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. गिरी येथील माड वाचवण्यासाठी चिपको आंदोलने झाली. हे माड तर संथ गतीने नष्ट करण्यात येत आहेत. दक्षिण गोव्यातील लोकांची भावनीत श्रद्धा असलेली झाडेही कापली गेली. अशाच प्रकारे पर्वरीतील खाप्रेश्वर देवाचा वडही कापला जाण्याची शक्यता आहे. हा वड न कापता त्याचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणीही होत आहे. प्रत्यक्षात सरकार आणि उड्डाण पुलाची कंत्राटदार कंपनी कोणता निर्णय घेतात, यावर सर्व अवलंबून आहे. मात्र उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे पर्वरीतील नैसर्गिक संपत्तीला बाधा येईल, हे मात्र कुणीही नाकारू शकत नाही.
उमेश झर्मेकर