रानकोंबडीला मारत असाल तर सावधान

फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहण्याचा माणसाने अंगिकारलेला गुण पशु-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. स्वार्थापोटी वन्यजीवाचा अधिवास नष्ट करावा व रानटी प्राण्यांचे मांस रुचकर लागते म्हणून उरल्यासुरल्या प्राण्यांवरही ताव मारावा हा कुठला न्याय?

Story: साद निसर्गाची |
17th November, 12:07 am
रानकोंबडीला मारत असाल तर सावधान

भात-मासळी-आमटीवर समाधानाने ताव मारणारे गोवेकर जेवणात रानटी प्राण्यांचे मांस सुद्धा तितक्याच आवडीने खातात. खाण्यासाठी बाजारात उपलब्ध बाॅयलर कोंबडी, बकरा यासारख्या प्राण्यांपेक्षा रानटी प्राण्यांचे मांस चविष्ट असते असा दावा मांसाहारी खवय्ये करतात. या कारणामुळे रानटी जनावराच्या मांसाला जास्त मागणी आहे. 

रानटी कोंबडी किंवा रानकोंबडी सहज हाताला लागत नाही. त्यासाठी पूर्ण नियोजन करावे लागते. ग्रामीण भागातील लोक रानकोंबडीला फास घालून पकडतात. कारण तेच. बाजारात मिळणाऱ्या बाॅयलर कोंबडीपेक्षा रानकोंबडीचे मास जास्त रुचकर असल्याचा दावा! यामागचे दुसरे कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेले रासायनिकीकरण. जास्त नफा मिळवण्यासाठी, झटपट पैसा कमवण्यासाठी विक्रेते अन्नपदार्थांमध्ये अस्वास्थ्यकारक रंग, लहान दगड, खडू भुकटी, बनावट माल, हानिकारक रासायनिक द्रव्य, लाकडाचा भुसा यासारखे अपायकारक पदार्थ मिसळवतात. हे फक्त अन्नपदार्थांच्याच बाबतीतच नव्हे तर प्राण्यांच्या बाबतीतही हेच करतात. बाजारात विक्रिसाठी ठेवलेल्या बहुतांश कोंबड्यांना हार्मोन्सच्या लसी टोचल्या जातात. चटकन विकता याव्यात म्हणून लहान वयातील कोंबड्याना मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंशांची लस टोचून जाड व धष्टपुष्ट बनविण्यात येते. यामुळे ग्राहकही आकर्षित होतात. अशाप्रकारे वाढवलेल्या कोंबड्या खाल्ल्याने माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) या महिलांमध्ये उद्भवणाऱ्या मासिक पाळीशी संबंधित समस्या, प्रामुख्याने, जलदगतीने वाढ व्हावी म्हणून हार्मोन्सची लस टोचलेली कोंबडी ग्रहण केल्याने उद्भवतात असे वैद्य सांगतात. ही अशी रासायनिक पद्धतीने वाढवलेली कोंबडी खाण्यापेक्षा नैसर्गिकरित्या वाढलेली कोंबडी खाणे केव्हाही चांगले हे सुद्धा रानटी प्राण्यांचे भक्षण करण्यामागचे कारण होय.  

आदिम काळापासून मनुष्य रानटी जनावरांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत आलेला आहे. राजा-महाराजा छंद म्हणून रानटी जनावरांची शिकार करत असत तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिकारी रानटी जनावरांची शिकार करून आपलं पोट भरत असत. यामुळे प्राण्यांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत होत असे. वाघ, सिंह यासारखी शिकारी जनावरे शेकरू, मोर, डुक्कर, गवारेडे, हत्ती यासारख्या उपद्रवी प्राणी-पक्षांची संख्या संतुलित राहिल्याने अन्नसाखळीही संतुलित राहत असे. 

काळ बदलाप्रमाणे पर्यावरण बदलले. तंत्रज्ञान व आधुनिकतेने मनुष्याच्या दिनचर्येत, आहार, स्वास्थ्य व इतर नानाविध बाबींमध्ये डोकं सरसावलं. हा बदल माणसाच्या जीवनात आपली पाळं-मुळं घट्ट करत गेला. मागचा पुढचा विचार न करता माणसाने हा बदल अंगिकारला. आज मनुष्याने जंगल, जमीन, आकाशावर अतिक्रमण केले आहे. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, जंगलतोड या ना अशा अनेक कारणांमुळे प्राण्यांचा अधिवास नष्ट होत आहे. यामुळे वन्यजीवाचं अस्तित्व धोक्यात येत आहे. फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहण्याचा माणसाने अंगिकारलेला गुण पशु-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. स्वार्थापोटी वन्यजीवाचा अधिवास नष्ट करावा व रानटी प्राण्यांचे मांस रुचकर लागते म्हणून उरल्यासुरल्या प्राण्यांवरही ताव मारावा हा कुठला न्याय? ह्या कारणामुळे दिवसेंदिवस प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. 

पाण्यात राहून आपण मगरीशी वैर नाही पत्करु शकत. पण दुर्दैवाने माणूस आज याच वाटेवर चालला आहे. रानटी प्राण्यांची हत्या करण्यावर बंदी असूनसुद्धा लोक साळ, रानडुक्कर, ससा, कांडेचोर, काळवीट यासारख्या रानटी जनावरांना चोरीछुपे मारतात, त्यांची अवैधरित्या विक्री करतात. मनुष्याच्या स्वार्थीपणावर निर्बंध घालण्यासाठी मोर, रानडुक्कर, काळवीट, कांडेचोर व अन्य प्राण्यांसोबत पर्यावरण मंत्रालयाने हल्लीच वन्यजीव संरक्षण कायद्याच्या परिशिष्ट १ मध्ये रानकोंबडीचाही समावेश केला आहे. एखादी व्यक्ती रानकोंबडीला फास लावून पकडताना आढळल्यास त्याला तीन वर्षापर्यंत कारावास व एक लाख रुपयापर्यंत दंड देण्याची कायद्यात तरतूद केलेली आहे. तसेच, एखादी व्यक्ती जर वारंवार वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत असेल तर त्या व्यक्तिला सात वर्षाचा कारावास व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)