सिव्हिल सर्व्हिसेसचे आपल्यातील गुण कसे ओळखावेत?

सिव्हिल सर्विसेसमध्ये जाताना आपण हे करियर का निवडत आहोत? यासाठी माझ्याकडे योग्य ते गुण आहेत की नाही? या क्षेत्राबद्दल माझ्याकडे पुरेशी माहिती आहे की नाही याबद्दल विचार करणे महत्त्वाचे.

Story: यशस्वी भव: |
17th November, 12:10 am
सिव्हिल सर्व्हिसेसचे आपल्यातील गुण कसे ओळखावेत?

यु. पी. एस. सी. करा, जी. पी. एस. सी. करा हे सर्व ठीक आहे परंतु हे करिअर का व कशासाठी करा हे खूपदा ९५ टक्के विद्यार्थ्यांना माहितच नसते. आपल्याला नेमक्या त्या कारकिर्दीतून मिळणाऱ्या संधींची माहिती असते परंतु त्यासाठी लागणारे व्यक्तिमत्त्वाचे गुण आपल्यात आहेत का? हे बघितले जात नाही. उदाहरणार्थ जर एखाद्याला आय.पी.एस. व्हायचे असेल, तर ज्या पदावर आपण काम करू त्याचा आवाकाच माहीत नसेल तर पुढे घोटाळा ठरलेलाच आहे. आय.पी.एस. झालेल्या विद्यार्थ्यांकडून खालील प्रकारच्या कलागुणांची अपेक्षा असते.

१. पोलीस दलाचे नेमके कार्य कसे चालते याची संपूर्ण माहिती असावी लागते. हे सर्व अभ्यासाव्यतिरिक्त जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते.

२. सायबर गुन्हे अथवा कोणतेही गुन्हे कसे व का घडतात व त्याचा तपास कशा पद्धतीने करावा लागतो. यासाठी एनालिटिकल थिंकिंग या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागते.

३. वरिष्ठ आणि कनिष्ठ पातळीच्या मध्ये आपणास काम करावे लागत असल्याने ऑथॉरिटी कशी वापरावी, ऑर्डर्स कशा द्याव्यात व कामे कशी करून घ्यावी त्याबद्दल काही गुणवैशिष्ट्ये डेव्हलप करावी लागतात.

४. सायबर गुन्हे, क्रिमिनॉलॉजी, सायकॉलॉजी, गुप्तहेर खात्यातील कार्यपद्धती, इंटेलिजन्स सर्व्हिसेस याची माहिती आधीच असणे अत्यंत आवश्यक आहे.

५. गृहखाते, त्याचा अभ्यास व योग्य आणि अयोग्य गोष्टी विवेकपूर्ण अवस्थेत अभ्यासाव्या लागतात.

आय.पी.एस.साठी जेव्हा उमेदवाराला अंतिम मुलाखतीसाठी नवी दिल्लीला बोलावतात व त्याचा जेव्हा इंटरव्यू होतो, त्यात या विषयांवर आपली सर्व मते स्पष्टपणे द्यावी लागतात. म्हणून आयपीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मनाची उजळणी आधीच करणे गरजेचे आहे. वर्दी ही नेहमी पब्लिक पॉलिसीचा विचार अधिक करते. त्यामुळे वैयक्तिक महत्त्वकांक्षा पुढे पब्लिक पॉलिसी जास्त उजवी ठरते आणि याचा प्रत्यय मुलाखती दरम्यान उमेदवाराला द्यावा लागतो. विद्यार्थी दडपण कसा हाताळू शकतो याचीही परीक्षा मुलाखतीमध्ये घेतली जाते. विशेषतः आय.पी.एस. निवडणाऱ्या उमेदवारांनी मी आय.पी.एस.च का निवडले आहे? याचा नीट विचार करून खरेखुरे मतप्रदर्शन करावे लागते.

सामान्य जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, हे नागरी सेवकाचे मुख्य काम आहे. हा निर्णय घेताना तो सार्वजनिक हिताचा निर्णय असावा. त्यात कोणत्याही घटकाला अधिक फायदा किंवा एखाद्या घटकाला नुकसान होता कामा नये. तसेच एखादा निर्णय घेताना वैयक्तिक, कौटुंबिक किंवा मित्रपरिवाराच्या फायद्याचा विचार करू नये. आपल्या कार्यकाळात निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. कारण नुसतेच निर्णय घेऊन देखील फायदा नसतो.

आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अगदी साधी रजा देण्यापासून पदोन्नती देण्यापर्यंत किंवा प्रसंगी कठोर कारवाई करताना देखील नागरी सेवक निःपक्षपाती असायला हवा. बाहेरील संस्थांना कामाची कंत्राटे देताना ती केवळ गुणवत्तेच्या आधारावर द्यावित. त्यात कसूर झाल्यास प्रसंगी योग्य ती कारवाई करावी. राजकीय नेत्यांना एखादा मुद्दा उलगडून सांगताना किंवा वरिष्ठांशी सल्लामसलत करताना मुद्देसूद निःपक्षपाती चर्चा करावी. हा गुण अंगी असेल तर वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात मोठा आदर मिळवून देणारा असतो.

लहानपणापासून घडलेल्या संस्कारामुळे म्हणा किंवा वैचारिक जडघडणीमुळे म्हणा प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी राजकीय विचारसरणीकडे झुकलेली असते. नागरी सेवक झाल्यानंतर मात्र कोणत्याही एका राजकीय विचारसरणीशी किंवा पक्षाशी लागेबंधे असणे हे धोकादायक असते. प्रत्यक्ष सेवेत असताना रोजच्या व्यवहारात, वागणुकीत, निर्णयप्रक्रियेत एका राजकीय विचारसरणीकडचा कल दिसता कामा नये. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडू नये. आपले मत, सल्ला, निर्णय प्रामाणिकपणे सांगावा.


अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)