साहित्य : अर्धा किलो बारीक रवा, २०० ग्रॅम साजूक तूप, सुकामेवा (काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता), ३०० ग्रॅम साखर, २ कप पाणी, अर्धा चमचा वेलची पूड, काळ्या मनुका.
कृती : प्रथम एका कढईत अर्धा किलो बारीक रवा घ्या. त्यात २०० ग्रॅम साजूक तूप टाका. तूप त्यात विरघळल्यानंतर रवा मंद आचेवर चांगला ७-८ मिनटे चांगला परतून घ्या. रव्याचा रंगही बदलता नये आणि तो कच्चाही राहता नये याची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा भाजत असताना इकडे तिकडे जाऊ नये कारण रवा पटकन करपण्याची शक्यता असते.
आता हा रवा हलका भाजून झाल्यानंतर त्यात सुकामेवा टाका आणि पुन्हा परतून घ्या. तुम्हाला सुकामेवा नको असेल, तर नाही घातला तरी चालेल. रव्यावर तुपाचा लेयर आला की समजायचं की रवा चांगला भाजला आहे. रवा थंड करायला ठेवा. साखरेचा पाक करायला घ्या. अर्धा किलो रव्यासाठी ३०० ग्रॅम साखर घ्या. यात दोन कप पाणी घ्या. हे सर्व एक तार येईपर्यंत उकळत ठेवा. दोन तारा आल्यास लाडू घट्ट होण्याची शक्यता असते. यासाठी साखर पाण्यात विरघळली की पाच मिनिटं हे उकळू द्या. पाकाचा एक थेंब वाटीत घ्या. तो जागचा हलला नाही, तर पाक तयार झाला आहे असे समजा.
पाक थंड झाल्यानंतर त्यात रवा घाला. पाकात गरम रवा घालू नका, नाहीतर त्याचा शिरा होईल. पाकात रवा छान एकत्र करा. त्यात वेलची पूड घाला. आता हे सर्व मुरण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर रवा पुन्हा मोकळा करा आणि लाडू वळायला घ्या. लाडू वळताना त्यावर काळे मनुका लावा. पांढऱ्या रंगावर काळा रंग छान उठून दिसतो. छान गोल लाडू वळून घ्या. अशाप्रकारे रवा लाडू तयार आहे.
संचिता केळकर