इथली तुळस ही फक्त मातीचे वृंदावन नसते. त्यात जिव्हाळा ओतलेला असतो. प्रेमाने ओथंबलेली मने तुळस घालत असतात. ते वृंदावन घरणीबाईने घाम गाळत, पण जराही न शिणता आनंदाने उभे केलेले असते.
दसरा संपला की, गोव्यातील जनमानसाला दिवाळीची आतुरता लागलेली असते. घरणीबाई तर तुळस माहेराला आल्यासारखी तिची काळजी घेत असते. दसऱ्याच्या दिवसापासूनच विविध फुलांनी तिला सजवते. तिच्यापुढे सुंदर सुंदर रांगोळ्या काढते. तिला अजून बहर येईल अशा प्रकारे तिची काळजी घेते. करता करता दिवाळी येते. दिवाळीच्या दिवशी तिच्या साक्षीने घरातली सर्व माणसं कारीट फोडून दुष्ट शक्तीचा नाश करतात. शुद्ध मनाने दिवाळीचे स्वागत करतात. दुसऱ्या दिवशी पाडव्याला याच तुळशीसमोर गोठा घातला जातो. पुन्हा एकदा गाई-गोधना विषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळी संपता संपता गोव्याची थोरली दिवाळी जवळ पोहोचते. म्हणजेच तुलसी विवाह जवळ येऊ लागतो. अशावेळी दिवाळीच्या दिवसात घरणीबाई ओवी गाऊ लागते,
तुळशीची गे माती
बंधू कालवू दोन्ही हाती
गोविंद आले राती
तुळशी मातेच्या कीर्तनाची
इथली तुळस ही फक्त मातीचे वृंदावन नसते. त्यात जिव्हाळा ओतलेला असतो. प्रेमाने ओथंबलेली मने तुळस घालत असतात. ते वृंदावन घरणीबाईने घाम गाळत, पण जराही न शिणता आनंदाने उभे केलेले असते. पूर्वी गोव्यातील प्रत्येक घरातील अंगणात मातीचेच सुबक असे तुळशी वृंदावन असायचे. हे वृंदावन तिने स्वतःच्या हाताने बनवलेले असायचे.
लाल जाडसर मातीची गोव्याची जमीन. त्यात चिकण माती शोधणे म्हणजे कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखे महाकठीण काम. पण असायची, जंगलाच्या कुठल्यातरी भागात ही चिकण माती असायची. त्या तिथे जायचे, चाळणीने ती माती चाळायची, अगदी बारीक कण असलेली माती गोळा करायची. कितीतरी खेपा मारत ती माती मोठ्या कष्टाने घरापर्यंत आणायची. या लाल चिकट मातीत पाणी घालून तिला हातानेच चांगले मळायचे. पिठाच्या गोळ्यासारखे मातीचे गोळे बनू लागताच त्या मातीपासून सुबक वृंदावन तयार करायचे.
आता लग्न झालेल्या स्त्रीला आपल्याला लहानपणीचे हे दिवस आठवतात. कशाप्रकारे ती आपल्या बंधूसह हे तुळशी वृंदावन बांधत होती हे तिला आठवतं आणि ती गाऊ लागते,
तुळशीची नी माती बंधू कालव दोन्ही हाती
आणि पुढे म्हणते, ह्या आपण हाताने बांधलेल्या तुळशीची एवढी महती आहे, की मी नुसती जात्यावर बसून जरी गात असली, तरी तुळशी मातेचे आराध्य दैवत विष्णूला वाटते की घरणीबाई आपल्या तुळशीचे कीर्तन गात आहे. म्हणून तुळशी मातेसाठी गायलेली ओवी भगवंताला कीर्तनासारखी भासते. त्या ओव्या ऐकायला प्रत्यक्ष भगवंत विष्णू आपल्या दारी येतो. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी तिला आपल्या संसारात भगवंताचा वास असल्याचे भासते आणि ही कृपा तुळशी मातेमुळेच आपल्यावर होत आहे असा तिचा अढळ विश्वास असतो. संसारातही परमार्थ बघण्याची ही दृष्टी क्वचितच कोणाकडे असते.
तुळशी विवाहाच्या दोन-चार दिवसा अगोदर तुळस बांधली जाते. तुळशीच्या प्रत्येक भागाला अगदी प्रेमाने आकार दिला जातो. तुळशीची वाटगुळी पेढी. जमिनीला लागूनच पाटासारखा पसरट भाग. त्यावर अचूक आयताकृती निमुळता चौथरा, त्या भागावर सुबह गोलाकार चार खूर आणि मधोमध बहरलेली तुळस. असे मातीचे तुळशी वृंदावन. ह्या आकारावरूनही घरणीबाईला जात्यावरची ओवी सूची लागते.
दारातले गे तुळशी
ही गे वाटगुळी तुझी पेढी
कार्तिकी दवादशी
नी गे रोज ही झाली धेडी
वाटगुळी पेढी आणि कार्तिकी द्वादशीला सजलेल्या नवरी बाई तुळशीची रोजां (झेंडू) चे झाड ही धेडी अशा कल्पक भाषेत तुळशी विवाहाचे सोपस्कारही ती सांगताना दिसते. दिवाळी म्हटल्यावर गोव्यात झेंडूच्या फुलांची मोठी मागणी. या झेंडूच्या फुलांना गोव्यात ‘रोजां’ असे म्हटले जाते. रोजांच्या फुलांशिवाय गोव्यातील दिवाळी जणू अपूर्णच. म्हणूनच कदाचित ही रोजां तिच्या ओवीतून डोकावतात. तुळसी विवाहावेळी आवर्जून तुळशीच्या सोबत हे रोजांचे झाड लावले जाते. तुळशीला सोबत म्हणून, तिची धेडी म्हणून.
दारातले गे तुळशी
हे घे चारही तुझे खुर
शिवशंकर माझे दिर
हे गे शिकारी गेले दूर
त्यांच्या नि जीवावर
आम्ही भवाया गे गवळणी
इथेही ती तुळशीला म्हणते की, तुझे खुर चारही बाजूने जसे तुझे रक्षण करता, तसेच शिवशंकराच्या रूपातील माझे दीर माझे, माझ्या घराचे रक्षण करतात. आज घराच्या भल्यासाठी शिकार करण्यासाठी दूरवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवावर आम्ही इथे गवळणीसारख्या सुखरूप फिरू शकतो ही जाण बाईला होती. पूर्वीची घरे रानाने वेढलेली असायची आणि मग कधीकाळी एखादे रानटी जनावर घराच्या आजूबाजूला आल्याचे दिसताच घरच्यांच्या रक्षणार्थ घरातील माणसांना आपल्या जीवावर उदार होऊन शिकारीसाठी जावे लागायचे. याची जाणीव ठेवून रात्री दळायला बसताच जावा जावा तुळशीलाच साक्षी ठेवून गात असायच्या.
घरणीबाईला तुळशीबद्दल अपार प्रेम. हे आपण तिच्या प्रत्येक ओवीमधून पाहिलंच आहे. ह्या तुळशीला साक्षी ठेवून ती आपला संसार करते. आपल्या पतीचा आणि आपला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानते. तुळशीबाईच्याच कृपेने आपल्या घरी मुला-बाळांच्या रुपाने ब्रम्हा-विष्णू रांगत आहे अशी तिची भावना असते. म्हणूनच ती म्हणते,
दारातले तुळशी
हे घे वाटगोळी तुझी पाना
प्रीतीची दोगाय जाणा
तुळशी काडिती प्रदक्षिणा
ब्रह्मा विष्णूचो अवतार
माझ्या अंगणी वावूरता
अंगणातील तुळस आणि हिंदू स्त्री यांचं नातं अतूट. घरणीबाई तुळशीची कधी लेक होते आणि आपली सारी दुःख तिच्या पुढे मांडते. कधी माता होते आणि प्रेमाने ह्याच तुळशीला गोंजारते. कधी हक्काने आपला अधिकार तिच्यावर गाजवते, रक्ताच्या बहिणीसारखी; तर कधी सखीसारखी तिच्याशी हितगुज करते. तिचं अख्ख आयुष्य ह्या तुळशीच्या साक्षीने ती जगत असते आणि म्हणून तर तिची प्रत्येक ओवी तुळशीच्याच आजूबाजूला घुटमळत असते. कारण तिने आपल्या संसारातील प्रत्येक पाऊल हे तुळशीच्या साक्षीने घातलेले असते.
गौतमी चोर्लेकर गावस