घुसमट

सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस अगदी मजेत, आनंदात गेले पण काही दिवसात तिला लक्षात येऊ लागले की टिपिकल पुरुषप्रधान संस्कृतीची झुळूक तिच्याही घरात येत आहे.

Story: कथा |
17th November, 12:13 am
घुसमट

मनूच्या घराबाहेर इकडे तिकडे विखुरलेल्या माणसातून वाट काढत रिदिमाने मनुच्या घरात धडधडत्या छातीने पाऊल टाकले. हॉलमध्ये ठेवलेल्या मनुच्या मृतदेहाकडे पाहताच रिदीमाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. इतक्यात मनूच्या सूनबाईने येऊन रिदिमाला घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मनूच्या नवऱ्याचे, मुलाचे सांत्वन करून रिदीमा अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी मनूला पहातच राहिली. मनूला पाचवी साडी नेसवली होती. हातात हिरव्या बांगड्या भरल्या होत्या. तिच्या ओठांवर तिच्या आवडीची लिपस्टिक लावली होती. कपाळभर कुंकू, नाकात नथ आणि तिच्या मृतदेहावर अगदी पायापर्यंत विखुरलेली फुले. फुलांच्या माळा, वेण्या... जणू मनू फुलराणीच! फुलांनी सजवून पुढच्या प्रवासाला निघाली होती, ती कायमची न परतण्याच्या वाटेवर.  

रिदीमा आणि मनूची मैत्री अगदीच कॉलेजपासून. दोघीही अभ्यासात खूप हुशार. कॉलेजमध्ये भरपूर स्वप्नं घेऊन त्यांनी डिग्री मिळवली, दोघींना चांगली नोकरी मिळाली तीही एकाच कंपनीत. काही दिवसात मनुचे लग्न ठरले. मनू उंबरठ्यावरचे माप ओलांडून एका उद्योगपतीची अर्धांगिनी झाली. 

सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस अगदी मजेत, आनंदात गेले पण काही दिवसात तिला लक्षात येऊ लागले की टिपिकल पुरुषप्रधान संस्कृतीची झुळूक तिच्याही घरात येत आहे. तिच्याही घरात स्त्रियांनी वेळीअवेळी बाहेर का पडायचे? सिनेमाला, पिकनिकला वारंवार जाऊ नये, तिचे घराकडे लक्ष असले पाहिजे... सारे मनूला जाणवायला लागले. मनूला फिरायची खूप आवड होती पण तिच्या सासू-सासर्‍यांना ते आवडत नव्हते. तिचा नवरा सहा महिन्यातून एकदा तरी तिला विदेशी बिझनेस टूरला घेऊन जायचा. पण तिथेही वागण्यात, बोलण्यात बंधने होती. मोकळेपणा, बिनधास्तपणा अजिबात नव्हता. आपला बिजनेस बरा, की आपण बरे असा वागायचा. नोकरीनिमित्त रिदीमा तिला भेटायची तेव्हा मनू रिदीमाजवळ आपले मन मोकळे करायची. 

मनू आपल्या संसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायची. सासू-सासरे तिच्यावर मुलीसारखे माया करायचे पण तिच्या जीवनात एक स्त्री म्हणून तिला हवे तसे स्वातंत्र्य नव्हते, मोकळेपणा नव्हता. हळूहळू मनूच्या पती महाशयांचा बिझनेस वाढू लागल्यामुळे तिला घरच्या उद्योग व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागले. तिला नोकरी सोडावी लागली. तिने पूर्ण वेळ स्वतःला घरच्या व्यवसायात झोकून दिले. तिच्या पतीची सहचारिणी म्हणून तिच्या हातात हजारो रूपये घोळायचे पण ते खर्च करण्याचे स्वातंत्र्य तिला नव्हते. तिने नोकरी सोडली तरी मनुची आणि रिदिमाची मैत्री मात्र घट्ट होती. 

मनूचा मुलगाही मोठा होऊन बापासारखा हुशार, कर्तबगार निघाला. हळूहळू बापाच्या व्यवसायात तो लक्ष घालू लागला. चांगल्या संस्कारी घरची लेक तिच्या घराचा उंबरठा ओलांडून लक्ष्मी रुपात सून म्हणून आली आणि मनुची जबाबदारी आणखीन वाढली. तिची सून बँकेत मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होती म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिला स्वत:साठी वेळ द्यायला मिळत नव्हता. आता स्वतःसाठी वेळ काढायचा प्रयत्न करू लागली. मनू आता मात्र हट्टाला पेटली होती. एकदा ठरवले की ते करून दाखवायचेच  हा तिचा स्वभाव पण घर ते ऑफिस करताना तिच्या मनांची घुसमट होत होती. हे सारे रिदीमाला जाणवत होते. 

मनूच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून या सगळ्याचा परिणाम म्हणून तिला हार्ट अॅटॅक आला. मनू मरता मरता वाचली तिला तातडीने एन्जियोप्लास्टी करावी लागली आणि चार दिवस हॉस्पिटलात ऍडमिट केल्यावर डॉक्टरांनी तिला विशेष काळजी घ्यावी लागेल असे सुचवले‌. मुलाने उद्योग व्यवसायाचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि आता तिला स्वतःसाठी वेळ मिळू लागला. तिने आता मनात पक्के ठरवले. मिळालेल्या वेळेचे सोने करायचे, स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या, राहिलेल्या इच्छा पूर्णपणे जगूनच नंतर या जगाचा निरोप घ्यायचा. इतके दिवस ती फक्त संसारासाठी, घरच्यांसाठी, घरच्या व्यवसायासाठी मूग गिळून राबराब राबत होती. आता ती हळूहळू बाहेर पडायला लागली, आपल्या आवडीनिवडी जपायला लागली. तिला मानसिक आधार द्यायला रिदीमा. 

मनू आता वारंवार सांस्कृतिक, संगीत कार्यक्रमानिमित्त घराबाहेर जाते हे तिच्या घरच्यांच्या, सासू-सासर्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी नाराजी दाखवायला सुरुवात केली. पैसे कमवण्यासाठी स्त्रियांनी बाहेर जायचे पण घरी येऊन घर संसार सांभाळायचा अशी त्यांची  धारणा सुरुवातीपासूनच होती. मनू मात्र आता प्रवाहा विरुद्ध जात होती त्यामुळे घरात नाराजीचे सूर उमटत होते. तिला वाईट वाटायचे तरीही तिने मनात ठाम निश्चय केला होता. आता स्वतःच्या आवडीनिवडी यांना प्रथम प्राधान्य द्यायचे. हे सारे ती रिदीमाला बोलून दाखवायची. या सगळ्यांचा तिला मानसिक त्रास होत होता आणि रिदीमालाही सारे जाणवत होते. 

हल्ली मनुला पित्ताचा खूप त्रास होत होता. कधी कधी तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मुलगा, सून आपल्या नोकरी व्यवसायात व्यस्त. रिदीमाने मनूला डॉक्टरकडे जाऊया म्हणून खूप समजावले, हट्टही केला पण मनू ऐकायला तयार नव्हती. तिचा नवरा ऑफिस कामानिमित्त परदेशात होता. जिवाची काळजी न‌ घेतल्यामुळे तिला दुसरा हार्ट अॅटॅक आला. हॉस्पिटलमध्ये नेताना सुनेच्या मांडीवर तिने प्राण त्यागला. “मी सहज हसत खेळत जगाचा निरोप घेईन. कोणालाच त्रास करणार नाही.” हे शब्द मनूने खरे करून दाखवले. 

रिदीमा मनुच्या शांत पडलेल्या मृतदेहाकडे बसून विचार करीत होती. ‘मनूच्या जाण्याला नक्की कोण जबाबदार? मनू स्वत: की तिच्या घरची? मनूच्या घरच्याजवळ, तिच्या संसारात रग्गड पैसा होता. पण तिचे मन मात्र कोणाला कळलेच नाही. तिच्या आवडीनिवडीना कोणीच प्राधान्य दिले नाही. मनूने आपल्या कामासमोर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही म्हणून मनू अकाली गेली? पुरुषप्रधान संस्कृतीत मनुच्या मानसिक अवस्थेकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नव्हता का?’ असे कितीतरी प्रश्न रिदीमाला सतावत होते ज्यांची उत्तरे स्वत: रिदीमाकडे नव्हती. या प्रश्नांची सारी उत्तरे आपल्या कवेत घेऊन मनू पुढच्या प्रवासाला निघाली होती.

शर्मिला प्रभू
फातोर्डा, मडगाव