‘उटा’ संघटनेने द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त फोंड्यात घेतलेल्या कार्यक्रमानंतर गावडे आणि तवडकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या ‘उटा’ संघटनेने द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त फोंड्यात घेतलेल्या कार्यक्रमानंतर गावडे आणि तवडकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर या आदिवासी समाजातील दोन दिग्गज नेत्यांमधील वादाचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. दोन्हीही नेते नाव न घेता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मंत्री गावडे यांनी ‘उटा’ संघटनेच्या द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त काहीच दिवसांपूर्वी फोंडा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून समाज आपल्यामागे किती ठामपणे उभा आहे, हे दाखवून दिले. तर, या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने संतापलेल्या सभापती तवडकर यांनीही आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. या दोघांच्या अंतर्गत वादात आदिवासी समाजात फूट पडू नये, यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदिवासी समाजाला एकसंध राहून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा सल्ला दिला. पण, गावडे आणि तवडकर हे आदिवासी समाजाचे दोन महत्त्वाचे नेते वारंवार आमने-सामने का येत आहेत, या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे.
‘उटा’च्या आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले गोविंद गावडे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा प्रियोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी भाजप आघाडी सरकारला पाठिंबा दिला आणि मंत्रिपद मिळवले. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेत गावडेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर प्रियोळमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवली. त्यात बाजी मारून ते पुन्हा मंत्रिपदी विराजमान झाले. या निवडणुकीत काणकोणमधून रमेश तवडकर विजयी झाले. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेली जवळीक यामुळे गोविंद गावडेंऐवजी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल, असा ठाम विश्वास त्यावेळी तवडकरांना होता. परंतु, भाजपने तवडकरांना विधानसभेचे सभापतीपद बहाल करून मंत्री म्हणून गावडेंना पसंती दिली. तेव्हापासून आतापर्यंत तवडकर यांनी अनेकदा मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. गत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काणकोणमधील सांस्कृतिक संस्थांना कला आणि संस्कृती खात्यामार्फत जाणीवपूर्वक सरकारी अनुदान देण्यात येत नसल्याचे म्हणत, सभापती तवडकर यांनी मंत्री गावडेंवर निशाणा साधला. त्यानंतर काही दिवस या दोघांमधील वाद धुमसत राहिला. त्यातच ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी अधिवेशन सुरू असताना तवडकर यांच्यावर आरोपबाजी केली. ही संधी साधून तवडकरांनी वेळीप यांच्यावर हक्कभंगाचा ठराव आणला. हे प्रकरण वाढण्याचा धोका लक्षात घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले.
आता ‘उटा’ संघटनेने द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त फोंड्यात घेतलेल्या कार्यक्रमानंतर गावडे आणि तवडकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात बोलताना मंत्री गावडे यांनी सभापती तवडकरांवर नाव न घेता निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तवडकर यांनीही पत्रकार परिषद घेत, ‘उटा’शी असलेले संबंध आपण २०१२ मध्ये तोडल्याचे स्पष्ट केले. पण, राज्य सरकार आणि मंत्री सभापतीपदाला मान-सन्मान देत नसतील, तर सभापतीपदाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर बिरसा मुंडा जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री गावडे पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे तवडकरांवर घसरले. स्वार्थासाठी धडपडणाऱ्या नेत्यांना बळी न पडण्याचा सल्ला त्यांनी समाजाला दिला. पण, यावेळी मात्र तवडकरांनी गप्प बसणे पसंत केले. बिरसा मुंडा जनजाती यात्रे दरम्यान त्यांनी गावडेंबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
एकंदरीत, मंत्री गावडे आणि सभापती तवडकर यांच्यातील वाद पुढील काळात आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. मंत्री गावडेंना हटवून मंत्रिपद मिळवण्यासाठी सभापती तवडकर धडपड करीत आहेत. त्यातूनच ते गावडेंवर आरोप, टीका करीत आहेत. तर, सभापतींच्या या प्रयत्नांना सुरूंग लावण्यासाठी गावडेंनी संपूर्ण समाज आपल्या पाठिशी घेतल्याची चर्चा सुरू आहे. या दोघांमधील वादावर तोडगा काढण्याचे आव्हान मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासमोर असेल, हे निश्चित!
सिद्धार्थ कांबळे
(लेखक दै. गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)