एक चूप

लघुपटच्या शेवटच्या दोन मिनिटांत कळते की ती तिच्या स्वातंत्र्यासाठी पाऊल तर उचलते. ती स्वतंत्रही होते. पण काय किंमत मोजून? तिने उचलेले पाऊल योग्य असते का नाही याबद्दल मात्र मनात शंका निर्माण होतेच.

Story: आवडलेलं |
16th November, 03:47 am
एक चूप

घरगुती हिंसाचार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हमखास एक चित्र उभे राहते. त्यात अशिक्षित, असंस्कृत माणूस असतो. घरात गरिबी असते, शिव्या असतात, मारहाण असते. या चित्रात एक कष्ट उपसणारी, पीडित बाई असते. पण ती एका कोणत्यातरी बिंदूवर येऊन सहन करणे थांबवते. स्वावलंबी तर ती असतेच कारण तिच्या खर्चावरच घर चालत असते. त्यामुळे तिच्या काम करण्याला त्याची ना नसते. उलट तिला गरजेपेक्षा जास्त काम करायला लावण्याकडेच त्याचा कल असतो. त्यामुळे सहनशक्तीचा अंत झाल्यावर ती योग्य तो निर्णय घेते. तिला लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल या गोष्टींची चिंता वाटत नसावी का काय हे माहीत नाही. कदाचित वाटत असेलच. पण या प्रश्नांपेक्षाही महत्त्वाची तिला आपली सुटका वाटत असावी. एकदा ही सुटका झाली की ती बहुतेक वेळा आयुष्यभरासाठी सुटते. कोणताच आव आणून तिला समाजात वावरावे लागत नाही.

 घरगुती हिंसाचाराचा दुसरा प्रकार म्हणजे अतिशय सुसंस्कृत घरात चालणारा. इथे दोघेही श्रीमंतीत असणारे, शिकलेले, समाजात मान, प्रतिष्ठा असणारे. या घरातील माणसाचा बाहेर वावरण्यासाठीचा एक देखणा मुखवटा असतो. त्यात ते आदर्श वगैरे असतो. यातल्या बाईचाही बाहेर वावरण्यासाठीचा आनंदाचा, समाधानाचा वगैरे मुखवटा असतो. पण श्रीमंती, शिक्षण, प्रतिष्ठा या सगळ्याच्या वेष्टनाखाली असते ती तीच मारझोड, शिव्याशाप! इथे पैशांचा प्रश्न नसल्यामुळे बाईचे पंख छाटले जातात. तिच्या शिक्षणाचा, हुशारीचा वापर होऊ नये म्हणून तिला शोभेची बाहुली करून ठेवली जाते. 'लोक काय म्हणतील?' हा प्रश्न इथे अतिशय महत्त्वाचा असतो कारण त्यांचे समाजात एक विशिष्ट स्थान असते. हे सुरक्षित वातावरण सवयीचे झाले असते. त्यामुळे, मुखवटा चढवून शांत बसणे हेच बरोबर हे मागची पिढी पुढच्या पिढीला शिकवत आलेली असते. 

पण क्वचित कधीतरी एक पिढी म्हणते की नाही, मागच्या पिढीने सांगितले ते बरोबर नाही. 'एक चूप’ या लघुपटात अशाच कुटुंबातील एक बारा वर्षांची मुलगी तिच्या डॉक्टर आईला सांगते की आई, आजी म्हणायची ते ‘एक चूप सो सुख' हे चूक आहे. आई विचारात पडते पण तिच्यात योग्य ते पाऊल उचलण्याची हिंमत अजूनही नसते. खरेतर अतिशय श्रीमंतीत राहणारी, स्वतः डॉक्टर असणारी ही स्त्री डॉक्टर नवऱ्याच्या अत्याचाराला का बळी पडत असते हा प्रश्न पडतो. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक त्रास सहन करणाऱ्या या स्त्रीला काम करण्याची तर परवानगी नसतेच. मुलगी वारंवार सांगत असूनही ही स्त्री स्वतःसाठी उभी राहत नसते. स्वतःसाठी उभी राहण्याची हिंमत नसली तरी नंतर घडणाऱ्या काही प्रसंगांतून निदान आपल्या मुलीसाठी उभे राहण्याची हिंमत तिच्यात येते असे आपल्याला वाटते. 

क्षणभर ती काय करेल याबद्दल उत्सुकता वाटते, काही आराखडेही आपण मनातल्या मनात आखतो पण लघुपटच्या शेवटच्या दोन मिनिटांत कळते की ती तिच्या स्वातंत्र्यासाठी पाऊल तर उचलते. ती स्वतंत्रही होते. पण काय किंमत मोजून? तिने उचलेले पाऊल योग्य असते का नाही याबद्दल मात्र मनात शंका निर्माण होतेच. कदाचित काही जणांना ते योग्य वाटेल. वाटेल, दुसरा पर्यायच काय होता? पण काहींना तो खटकेल. वाटेल, की नाही. हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणे आहे का? खरेतर हा मोठा विषय १४- १५ मिनिटांच्या लघुपटातून मांडणेही कठीण काम. बघणाऱ्या इतक्या कमी वेळात कथेत गुंतवून घेण्यासाठी कथा ताकदीची हवी. घरगुती हिंसाचार, मानसिक छळ आणि त्यातून होणारी सुटका हा तसा नेहमीचाच, बऱ्याच वेळा अनेक माध्यमांतून विशेषत: लघुपटातून अनेकदा मांडला गेलेला विषय आहे. पण हा लघुपट विशेष लक्षात राहतो तो त्याच्या शेवटामुळे. तसे बघितले तर शेवटी तिचा विजयच होतो. ती स्वतंत्र होते.. पण ती स्वतःसाठी उभी राहते का? हा प्रश्न आपल्यापुढे येतो. 

या लघुपटाच्या निमित्ताने या दोन्ही प्रकारच्या घरगुती हिंसाचाराची तुलना केली. पहिल्या बाबतीत काहीच सामाजिक प्रतिष्ठा नसल्यामुळे नवरा मारहाण करतो हे उघडपणे सांगता येणे शक्य होते पण दुसऱ्या बाबतीत मात्र स्त्रीला स्वतंत्र होतानाही नवऱ्याच्या प्रतिष्ठेचा विचार करायला लागतो, त्यासाठी आव आणावा लागतो. हा कदाचित तिच्यावर होत असलेला तितकाच भयंकर अत्याचार असावा.


मुग्धा मणेरीकर, फोंडा