व्हडली दिवाळी जवळ येताच अंगणाची डागडुजी व्हायची, अंगण शेणाने सारवून अगदी गुळगुळीत केले जायचे. सप्टेंबरपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने तुळशीचा रंगही उडालेला असायचा. तुळशी वृंदावनाची साफसफाई, रंग-रंगोटी व्हायची. छान नवरीसारखे तिला सजवले जायचे.
आपल्या निसर्ग संपन्न गोव्यात कितीतरी सण, उत्सव घराघरांतून, मंदिरांतून उत्साहाने, आनंदाने अगदी धुमधडाक्यात साजरी केले जातात. या सर्व सण उत्सवांमध्ये अगदी परंपरेचे जतन करत घराघरांतून, मंदिरांतून अगदी थाटामाटात साजरे होणारे सण म्हणजे भाद्रपद मासी गणेश चतुर्थी, त्यानंतर कार्तिक मासी संपन्न होणारी दीपावली व डिसेंबर महिन्यात साजरा होणारा नाताळ सण. हे तिन्ही सण अगदी खेड्यापासून ते शहरापर्यंत घराघरांतून, मंदिरांतून उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात. तसे पाहायला गेल्यास दीपावली सणाची सुरुवात गोवत्स्वादशी म्हणजेच वसुबारस या सणाने होते. आमच्या गोव्यात मात्र दीपावलीला प्रारंभ होतो तो ‘धाकट्या दिवाळीच्या’ सणाने म्हणजेच नरक चतुर्दशीने आणि दीपावलीची समाप्ती होते ‘व्हडल्या दिवाळीने’ म्हणजेच तुलसी विवाहाने.
नरक चतुर्दशी दिवशी नरकासुर वध, नंतर अभ्यंग स्नान करून दिपोत्सव साजरा केला जातो. यानंतर येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रामुख्याने व्यापारी आस्थापने, दुकाने, ऑफिसमधून लक्ष्मी मातेची पूजा बांधतात. गृहिणी घरातील देवघरात लक्ष्मी मातेची पूजा करतात. त्यानंतर येणारा पाडवा याला ‘गोरवा पाडवो’ म्हणतात. या दिवशी गोठ्यातील गोधनांची परंपरेनुसार पूजा केली जाते. भाऊबीजेचा सणही गोव्यात थाटामाटात साजरा केला जातो. अशा या दिवाळी सणांच्या मालेची व्हडल्या दिवाळीने म्हणजे तुलसी विवाहाने सांगता होते.
व्हडल्या दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधी गोव्यात मुलीला पाठवायच्या पारंपरिक, वार्षिक ‘वज्याचा' थाटमाट असतो. तुलसी विवाहासाठी लागणारे सर्व पूजा साहित्य तसेच इतर साहित्य त्या निमित्ताने मग सासुरवाशिणींना माहेराहून पाठवले जाते. यात प्रामुख्याने नवीन सासुरवाशिनीला पूजेचे साहित्य, पोहे, गुळ, फराळाचे खास जावयासाठी नेसायचे पितांबर व बसायला पाटही पाठवला जातो. कार्तिक प्रबोधिनी एकादशीला म्हणजे तुलसी विवाह समारंभाच्या आदल्या दिवशी विवाहित स्त्रिया एकादशीचा उपवास करतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असे पाच दिवस पैकी एखाद्या दिवस तुळशी विवाह सोहळा संपन्न होतो.
अंगणातील तुळशी वृंदावनाचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण आहे. भारतीय परंपरेनुसार देवघरातल्या देवाची पूजा झाल्यावर तुळशी वृंदावनातल्या तुळशीची पूजा केली जाते. घरातल्या सवाष्ण स्त्रीने रोज सकाळी स्नान करून देवपूजा आटोपल्यानंतर दारातल्या तुळशी वृंदावनातील तुळशीला हळद-कुंकू, फूल वाहून तिला पाणी घालून रोज तिची पूजा करायची असते. तीन्हीसांजेला तुळशी वृंदावनापाशी निरांजन प्रज्वलित केले जाते. माझ्या बालपणी शाळेला जाताना देवाला, तसेच तुळशी वृंदावनाला पाया पडून, एक प्रदक्षिणा घालून मगच विद्याग्रहणासाठी बाहेर पडायची परंपरा होती. माझ्या माहेरी भल्या मोठ्या अंगणाच्या मध्यभागी सुंदर असे तुलसी वृंदावन होते. अंगणांची नित्यनेमाने झाडलोट व्हायची. व्हडली दिवाळी जवळ येताच अंगणाची डागडुजी व्हायची, अंगण शेणाने सारवून अगदी गुळगुळीत केले जायचे. सप्टेंबरपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने तुळशीचा रंगही उडालेला असायचा. तुळशी वृंदावनांची साफसफाई, रंग-रंगोटी व्हायची. छान नवरीसारखे तिला सजवले जायचे.
तुळशी विवाहाच्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वादशीला घरातील पोरी, बायका सकाळी तुळशी वृंदावनावर तसेच तुळशीपाशी हळदी कुंकवाची छान रांगोळी घालायच्या. दुपारच्या जेवणाला महाप्रसादाचा खास सात्विक शुद्ध शाकाहारी जेवणाचा बेत असायचा. यात खतखते, मूग, वरण, भाजी, पुरी आणि नारळाच्या दाटसर दुधातील खमंग वेलचीच्या सुगंधातील गुळ घातलेले पोहे. आई तुळशीमातेला सुग्रास जेवणाचा नैवेद्य दाखवायची. तुळशीच्या शेजारी केलेल्या मातीच्या छोट्या तुळशीलाही सजवण्यात दुपारचे चार वाजायचे. तुळशीच्या चारही बाजूंनी दिंड्याच्या काठ्या करून त्याचे आडोशाला शुभ्र रंगाची कोवळ्या ताज्या केळीच्या गाब्यांची पांढरट रंगाची सालपटं लावली जायची. त्याच्यावर छान झेंडूच्या फुलांच्या तसेच विद्युत रोषणाईच्या माळा सोडून मांडव छान सजवला जायचा. लख्ख विद्युत माळांच्या आकाश कंदीलाच्या उजेडात तुळशी वृंदावन सुंदर दिसायचे.
तिन्ही सांजेला या तुळशीसमोर समई प्रज्वलित केली जायची. पणत्यांनी सगळा परिसर लख्ख उजळायचा. तुळशीत दिंड्याची काठी, चिंचेची फांदी, आवळ्याची फांदी, ऊस खोवला जायचा. तुळशीला खास ताज्या अबोलीच्या फुलांचा गजरा माळला जायचा. घरातील बुजुर्ग व्यक्ती तुळशी पूजेला बसायचे. भटजी तुळशी वृंदावनांत श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून यथासांग पूजा करायचे. मंगलाष्टकाच्या जयघोषणात अंतरपाट धरून तुळशी माता(लक्ष्मी )व श्रीकृष्णाचा विवाह संपन्न झाल्यानंतर घरातील सव्वाष्ण बायका तिची खणा नारळाने ओटी भरायच्या. तिला खास फळांचा निवेद अर्पण केला जायचा. या दिवशी खास ओल्या खोबऱ्याच्या नारळ आणि गूळ घातलेल्या गावठी पोह्यांचा नैवेद्य अर्पण केला जायचा. चुरमुऱ्यांचे लाडू शिवाय ऊस, आवळा, चिंचेचे तुकडे नैवेद्य म्हणून वाटले जायचे. यथासांग विवाह पार पडल्यावर आरत्या म्हटल्या जायच्या. घरातील सगळ्या सवाष्ण बायका कापसाच्या वातीच्या एकशे आठ जोडव्यांची आरती हातात घेऊन तुळशीमातेला प्रदक्षिणा घालायच्या.
पापनाशिनी, हरिप्रिया तुळशी मातेपाशी घरातल्या सर्व सदस्यांच्या आनंद, शांतीसाठी मागणे मागितले जायचे. सवाष्ण बायका सौभाग्याचे दान तसेच ‘घरातील उपवर मुला-मुलींची लग्न सुयोग्य वर मिळून योग्य वयात निर्विघ्नपणे पार पडो’ ही मागणी करायच्या. मुळात माणूस हा अगदी सामाजिक आणि उत्सवप्रिय प्राणी आहे. या दोन-तीन वर्षात गोव्यातील निसर्गचक्रात फार मोठा बदल झालेला आहे. दीपावली सणाच्या दिवसातही थंडीऐवजी पाऊस पडतो. तरीही गोव्यात तुळशी विवाह हा सण अगदी उत्साहात, धुमधडाक्यात साजरा केला जातो.
- शर्मिला प्रभू