संवाद खुलवणारे इमोजी

भावनिक कोमलता, मृदुता, मायेची ममता इमोजीत दाखवणं हे सोप्पं काम नाही. पण वाहत्या प्रवाहासोबत वहात जाणं ही आजच्या काळाची गरज असल्याने हसत हसत आपल्यालाही हसऱ्या चेहऱ्याने इमोजीचे स्वागत करावेच लागेल. कालाय तस्मै नम:!

Story: मनातलं |
09th November, 04:48 am
संवाद खुलवणारे इमोजी

परवा एका मैत्रिणीला मोबाईलवरून एक खमंग, खुसखुशीत जोक पाठवला तर तिने तीन वेळा खदखदून हसणाऱ्या इमोजीचे चित्र पाठवले जे पाहून मलाही हसू फुटले. हल्ली अशी ही मनोरंजनाची चित्रभाषा इमोजी जगभर प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत चालली आहे. ऑनलाइन संवादाचा एक अंगभूत भागच बनली आहे. अगदी सर्वसाधारण माणूस सुद्धा हिचा वापर करू शकतो आणि तो वापर इतका व्यापक स्वरूपात होऊ लागलाय की तिथे भाषा, संस्कृती, देश, परदेश यांच्या सीमा ओलांडून एकमेकांशी संवाद साधण्याचं ते एक प्रभावी साधन म्हणून पाहता येऊ लागलंय कारण प्रत्येक इमोजी विशिष्ट भावना व्यक्त करते. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते दर्शवते. 

हसणारा चेहरा आनंद दर्शवतो, डोळ्यात अश्रुवाला दु:ख झाले हे सांगतो, अचंबित झालेला चेहरा, भयभीत झालेला चेहरा, झोप आली दाखवणारा हे झाले चेहऱ्यांचे प्रकार; तर काही हस्तमुद्राही आपले मत दर्शवतात. ठीक आहे, टाळी वाजवणं, माफी मागणं, हॅलो म्हणणं, नमस्कार करणं, ‘व्ही’ शेप जीत झाली हे दाखवतात. हार्टशेप बरंच काही या हृदयीचं त्या हृदयी सांगून जातं. इमोजी सात प्रकारात दिसतात. चेहरे, भावदर्शक चेहरे, खाणे पिणे दर्शवणारे, झेंडे, वस्तु, स्थान प्रतीक, मौसम, जनावरे किंवा प्राणी. ‘इमोजी’ हा शब्द जपानी शब्द ‘ई’ आणि ‘मोजी’ या दोन्हींचा मिळून बनलेला आहे. ज्याचा अर्थ चित्र आणि चरित्र असा होतो. याचा ‘इमोशन’ किंवा ‘इमोटीकॉन’ या शब्दांशी मिळताजुळता अर्थ होतो. याचा उगम जपानमध्ये १९८० ते १९९० च्या दरम्यान झाला १९९९ मध्ये शिगेतका कुरिता याने १७६ इमोजी बनवले. २०१० पासून त्याचा जगभरात वापर होऊ लागला. माणसाचं वय, लिंग, भाषा, देश याचा कसलाच अडथळा न येता इमोजी आपलं काम परफेक्ट करत असते. ती एक उत्कृष्ट अशी संवादाची चित्ररूपी भाषा बनत चालली आहे. जो अर्थ चार ओळीत किंवा अनेक शब्दात सांगता येणार नाहीत इतक्या अचूक भावना एका इमोजीच्या माध्यमातून सांगता येतात. पण काही लोकांच्या मताप्रमाणे यामुळे भाषेचे महत्त्व कमी होत चालले आहे असा होतोय, तसे काही नाही. पण भाषेच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि आपले मत प्रभावीरित्या मांडण्यासाठी इमोजी वापरणं चांगलं ठरतं. 

‘इमोजी’ ही कल्पक भावना किंवा कृती व्यक्त करण्यासाठी वापरली जातात. हा एक चित्रमय भाषेचाच प्रकार आहे. तुम्हाला एखादी गोष्ट ऐकून दु:ख झालंय हे चार ओळीत वर्णन करून लिहून सांगण्यापेक्षा एक रडका चेहरा तुमचं काम सोप्पं करून जातो. तुमच्या मनातल्या भावना दुसऱ्यापर्यंत लगेच पोचतात. एक खूप छानशी इमोजी पाठवून तुमचा आनंद शेयर करू शकता. ती इमोजी तुम्हाला किती आनंद झाले हे दाखवून देईल. गोव्यात खूप पाऊस आहे हे पावसाची इमोजी दाखवली की कळेल. काही इमोजी पाठवणं थोडं रिस्की असतं त्यामुळे गैरसमज होऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत थोडे इमोशन सांभाळून वापरावे लागतात. पाठवताना तुम्हाला त्याचा अर्थ बरोबर माहिती असावा. तुम्ही प्रेमात पडलाय, लाजताय, रोमॅंटिक बनलात, फ्लर्ट करणं, कीस पाठवणं हे ही समोरच्याच्या भावनांचा विचार करून वापरावं लागतं. हृदय हे प्रेम संबंधित सिंबॉल असतं पण ते मैत्री, प्रेम आणि हार्ट दाखवण्यासाठीही वापरलं जातं. हृदयाच्या लाल, गुलाबी, पिवळ्या, हिरव्या आणि त्या त्या रंगाप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो आणि अर्थही. काही क्रिया दर्शवणारे इमोजी तुम्ही सध्या काय करता हे दर्शवतात. चेहरा झाकणारा इमोजीचा संदर्भावरून अर्थ लावावा लागतो. तो लज्जास्पद असेल, चेष्टायुक्त असेल, ‘अगोबाई!’ असेल, किंवा ‘अरे देवा! हे काय झालं?’ असाही असेल. 

आपल्या दैनंदिन संवादाचा भाग होऊ पाहणारा हा इमोजी अर्थ, मजकूर आणि सामाजिक परिस्थिती या संदर्भावर अवलंबून असल्याने ती एक सार्वत्रिक भाषा होऊ शकत नाही, पण कधीकधी लिहित बसायला पुरेसा वेळ हातात नसतो तेव्हा याचा वापर करणं सोप्पं पडतं. बरेचदा विशिष्ट भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी वापरतो पण ती तुम्हाला जो सांगायचा तोच मजकूर पोचवते की नाही हे पाहणं गरजेचं असतं. जेव्हा आपण समोरासमोर बोलतो तेव्हा आपले हावभाव, आपल्या चेहऱ्यावरचे स्नायू, शारीरिक हालचाल, डोळे इत्यादि गोष्टींचा समावेश असतो. ते सर्वच इमोजीत समाविष्ट होऊ शकत नाहीत म्हणून ते अपूर्ण वाटते. इमोजी ही भाषा नाही आणि भाषेला पर्याय तर मुळीच नाही पण कधीकधी प्रतिमा ही शब्दापेक्षा उत्कट जास्त प्रभावशाली ठरते विशेषतः मुलांच्या बाबतीत भाषेतल्या शब्दांपेक्षा चित्रांची भाषा त्यांना चटकन समजते, अवगत होते म्हणून ती वापरणं सोप्पं होतं. 

इमोजी आभासी जगाशी संबंधित असल्या, तरी हळूहळू त्या आपल्या दैनंदिन जीवनात प्रवेश करू पहात आहेत कारण मोबाईल वापरात झालेली वाढ पाहता संवाद माध्यम जास्त सोप्पं सुटसुटीत होण्याकडे लोकांचा कल राहतो, त्यामुळे इमोजीचा वापर दिवसेंदिवस वाढतच जाईल असं वाटतंय. फक्त त्यामुळे भाषेतला शब्दसंग्रह कमी होत जाईल ही भीती वाटते आणि भाषेतल्या प्रत्येक शब्दाला एक वेगळी छटा असते, कमी अधिक खोली असते, नादमाधुर्य असतं, प्रत्येक शब्द चपखलपणे कुठे बसेल याचे काही ठोकताळे असतात. ते या इमोजीच्या वापरातून साध्य होतील का? ते पाहणं गरजेचं ठरेल. भावनिक कोमलता, मृदुता, मायेची ममता ती इमोजीत दाखवणं हे सोप्पं काम नाही. पण वाहत्या प्रवाहासोबत वहात जाणं ही आजच्या काळाची गरज असल्याने हसत हसत आपल्यालाही हसऱ्या चेहऱ्याने इमोजीचे स्वागत करावेच लागेल. कालाय तस्मै नम:!


- प्रतिभा कारंजकर