खेळाचं मैदान - आयुष्याचे पुस्तक

बुद्धी असून आरोग्य नसेल तर ती व्यक्ती मागे पडते. जीवनाच्या विशालकाय मैदानात बाजी मारायची असेल तर मैदानी खेळ, व्यायाम ह्या शिवाय पर्याय नाही.

Story: लेखणी |
16th November, 03:43 am
खेळाचं  मैदान - आयुष्याचे पुस्तक

ALL WORK AND NO PLAY MAKE JACK A DULL BOY. अगदी खरं आहे. फक्त अभ्यास एके अभ्यास आणि काम एके काम असे कधीच असू नये. मेंदूच्या आणि बुद्धीच्या वाढीसाठी जितका अभ्यास, पुस्तके वाचणे इत्यादी आवश्यक आहे तितकाच खेळ आणि शारीरिक व्यायामसुद्धा व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तितकाच आवश्यक आहे. 

"व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं। आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥" 

म्हणजेच व्यायामामुळे आरोग्य, दीर्घायुष्य, शक्ती आणि आनंद मिळतो. आरोग्य हे सर्वोच्च भाग्य आहे तसेच आरोग्य हे सर्व उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन आहे. बुद्धी असून आरोग्य नसेल तर ती व्यक्ती मागे पडते. जीवनाच्या विशालकाय मैदानात बाजी मारायची असेल तर मैदानी खेळ, व्यायाम ह्या शिवाय पर्याय नाही. 

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे हे खूप महत्त्वाचे आहे. अगदी लहानपणापासूनच खेळ आणि वेगवेगळ्या क्रियांद्वारा मुलांचा स्थूल व सूक्ष्म स्नायूंचा विकास व्हायल लागतो. ह्यातूनच मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकासही घडत असतो. व्यक्ती जर निरोगी नसेल तर त्यांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनही नकारात्मक बनतो. त्याच उलट आरोग्यवान व्यक्ती, कितीही अडथळे आले तरी त्यांच्याकडे तो सकारात्मक दृष्टीनेच बघत असतो. 

खेळाच्या मैदानात लहान थोर सगळेच एकाच जोमाने वावरताना दिसतात. एकमेकाला प्रोत्साहन देतात. स्वतःची आणि सवंगड्यांची काळजी घेतात. जबाबदारीने वागतात. जिंकले तर जल्लोष आणि हरले तर नव्या ताकदीने पुन्हा उभारण्याची उमेद. सांघिक भावना नकळत शिकतात. त्याच प्रमाणे खिलाडू वृत्ती वाढीस लागण्यास कारणीभूत होते. हे सगळं शिकवलं जातं ते मैदानातल्या खेळांमध्ये. 

खेळाच्या मैदानावर जसे खेळाडू स्वतःच्या निश्चयाचे तसेच कप्तानाच्या आदेशाचे चोख पालन करीत जास्तीतजास्त वेळा यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांच्या बिनकामी बोलण्याकडे लक्ष देत नाही. तसेच काहीसे आपल्या आयुष्याचेही आहे. आपण आपले मनापासून कर्तव्य पार पाडत राहावं. स्वतःला समाधान लाभणे महत्त्वाचे. दुसऱ्यांना काय वाटते ह्याची खंत किंवा दुसरे काय बोलतात ह्याची खंत जास्त वेळ टिकत नाही. कारण आपले आपण त्याचं निवारण करू शकत नाही कारण दुसऱ्याच्या समाधानाची मोजपट्टी आपल्या हातात नसते. 

खेळाच्या मैदानावर जोपासलेली खिलाडू वृत्ती, सांघिक कार्य करण्याची आवड, नाउमेद न होण्याचे बाळकडू पुढील व्यक्तिगत आयुष्यात माणसाने जोपासले तर जीवन प्रवास हा नक्कीच सोप्पा आणि सहर्ष पार पडेल. विद्यार्थी दशा असो, गृहस्थाश्रम असो व वानप्रस्थाश्रम असो, ह्या सर्व दशेतील पेच प्रसंगांना खिलाडू वृत्तीने सामोरे जात येईल. ह्या तीन अवस्थांतील आपणसुद्धा एक खेळाडूच आहोत हे विसरून चालणार नाही.

 आपल्या कंटाळवाण्या दैनंदिन जीवनामुळे निर्माण झालेला आळस काढण्यासाठी खेळ पुरेसे मनोरंजन देतात. खेळाच्या मैदानावरुन मिळणारी कला, कौशल्य आपल्याला जीवनातील संघर्षाचा सामना करण्यास मदत करतात.

माझ्या शालेय कारकिर्दीत बऱ्याचदा पालकांची कुरकुर ऐकली. आमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नाहीत असे सांगणारे पालक कधीच आपली मुले खेळायला जात नाहीत म्हणून तक्रार घेऊन आली नाहीत. आता तर बरीच शाळांना पुरेसं मैदानही नसतं. असे असेल तर मुले खेळणार कुठे? हल्ली लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, एककल्लीपणा वाढल्याचं आपण बघतो. त्याचप्रमाणे खूप जणांना पचनाचे विकार पाहतो. बऱ्याचदा असंही पाहण्यात येतं की, मुले एकमेकात मिसळत नाहीत. ह्या सगळ्यांवर एकच उपाय तो म्हणजे खेळाचे मैदान व व्यायाम. घराबाहेर मैदानावर खेळणे किंवा व्यायाम करणे केवळ मुलांच्या शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर त्यांच्या  मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले आहे. 

एका संशोधनात असे दिसून आले की १९८० मध्ये केवळ ७% मुलांनी लठ्ठपणाचे निकष पूर्ण केले. तीन दशकांनंतर, तीन पैकी एकापेक्षा जास्त मुले लठ्ठपणाच्या वर्गीकरणात आली. बालपणातील लठ्ठपणामध्ये अशा तीव्र वाढीची दोन मुख्य कारणे आहेत - मुले पूर्वीपेक्षा जास्त खातात आणि कमी हलतात.

जी मुले जास्त वेळ बाहेर खेळतात ते बसून राहणाऱ्या मुलांपेक्षा जास्त उत्साही असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये लठ्ठ होण्याची शक्यता कमी असते. तासनतास टेलिव्हिजन किंवा संगणकासमोर न बसल्यामुळे  ते सक्रिय राहतात आणि कॅलरीज बर्न करतात.

मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, मुले मानसिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हायला हवी असतील तर खेळाशिवाय पर्याय नाही. खेळ, व्यायाम ह्या गोष्टी मुलांच्या मनावर त्यांच्या संस्कारक्षम मनावर बिंबवायला हव्यात किंबहुना त्या अंगवळणी पडायला हव्यात. 


अनिता कुलकर्णी