धोका ‘सीओपीडी ‘चा…

बदलती जीवनशैली, शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढतच आहेत व यामुळे ‘सीओपीडी’ च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

Story: आरोग्य |
16th November, 03:39 am
धोका ‘सीओपीडी ‘चा…

जागतिक स्तरावर ‘सीओपीडी’ मृत्यूचे तिसरे कारण आहे व धूम्रपान करणाऱ्यांमधील ५० टक्के लोकांना हा आजार होण्याचा धोका असतो. जगभरातील लोकांमध्ये सीओपीडीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारी जागतिक सीओपीडी केला जातो. या सीओपीडीबद्दल आज आपण बोलूयात..

सीओपीडी होण्याचे कारण?

प्रदूषण, धूर किंवा धूम्रपान या कारणांनी कार्बन मोनोक्साइड, सल्फर डायऑक्साइड, धूलिकण किंवा अन्य कण श्वासाद्वारे प्रवेश करतात. फुप्फुसातील ‘अॅल्विओलाय’ ऑक्सिजन सोडण्याचे व कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे कार्य करते. हे प्रदूषित घटक त्या ‘अॅल्विओलाय’वर आघात करून त्याचा घेर वाढवितात. त्यामुळे फुप्फुसाची लवचिकता कमी होते. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. कार्बन डायऑक्साइडचे योग्य पद्धतीने उत्सर्जन होत नाही.

सीओपीडीचे प्रकार 

सीओपीडीमध्ये एम्फिसीमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस हे विकार तर सर्वाधिक आढळतात. एम्फिसीमामध्ये फुफ्फुसातील अॅलविलायचा हळूहळू नाश झाल्यामुळे बाह्य वायुप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ब्राँकायटिस हे ब्रोन्कियल पॅसेजची जळजळ आणि आकुंचनाद्वारे दर्शविले जाते, ज्यामुळे श्लेष्मा जमा होऊ शकतो. सीओपीडी, उपचार न केल्यास, रोगाची जलद प्रगती होऊ शकते, 

सीओपीडीचे रोगनिदान

पहिल्या दोन स्तरांमध्ये रोगनिदान झाले, तर स्थिती आटोक्यात आणणे सोपे जाते. पुढे दिवसेंदिवस फुप्फुसांची क्षमता कमी होत जाते व गेलेली क्षमता औषधाने परत मिळवता येत नाही. अर्थात खोकला, दम लागण्याचा त्रास कमी होतो. मात्र, फुप्फुसाची ताकद आधीसारखी करता येत नाही. त्यामुळे 'सीओपीडी'त फुप्फुसांची ताकद कमी न होऊ देणे हा प्रतिबंधात्मक उपायांचा एक भाग आहे. यावर उपचारपद्धती ही दम्याप्रमाणे इन्हेलर थेरपी व औषधोपचार आहे. मात्र, यासोबत 'रिहॅबिलिटेशन थेरपी' देखील आवश्यक आहे. यात फुप्फुसांचे पुनर्वसन करण्यासाठी, म्हणजे सध्या असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने व्यायामाद्वारे ताकद कायम ठेवता येते. हा औषधोपचारानंतरचा पुढचा टप्पा आहे. ऑक्सिजनची कमतरता असेल, तर ऑक्सिजन घेणे, सी-पॅप किंवा बाय पॅपद्वारे श्‍वसनक्रिया सुलभ करण्यास मदत होऊ शकते. 

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

 सीओपीडी होऊ नये म्हणून सर्वप्रथम धूम्रपान पूर्णपणे टाळावे.  सिगारेट, विडी यासारखे व्यसन हे त्या व्यक्तीच्या सीओपीडीला आमंत्रण असतेच, पण सभोवतालच्या व्यक्तींनाही सीओपीडीचा धोका निर्माण होतो. प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करावा. धुळीत काम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक पोलीस अशा प्रदूषणात आणि धुरात काम करणाऱ्या सर्व व्यक्ती सीओपीडीसाठी संभाव्य रुग्ण असतात. घरातील व घराबाहेरील प्रदूषण देखील टाळावे. ग्रामीण भागात घरात जळणावर होणारा स्वयंपाक हे घरातील प्रदूषण आहे. मच्छरमार अगरबत्त्याही घरातील प्रदूषकच आहेत. प्रशासनाने आखून दिलेल्या प्रदूषणासंबंधी नियमांचे पालन करावे. या लक्षणांबाबत आपण जागृत राहिलो, तर लवकर रोगनिदान होऊन उपचार मिळतील व गुंतागुंत नक्कीच टाळता येईल.

फुप्फुसे निरोगी ठेवा.. 

वाढलेले प्रदूषण आणि बिघडलेल्या जीवन शैलीमुळे निरोगी फुप्फुसे आजच्या काळासाठी अति आवश्यक आहे. त्यासाठी सकस आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम, दीर्घश्वसन ताणतनाव मुक्त जीवन ही त्रिसूत्री महत्त्वाची आहेच. पण त्याबरोबर आपला परिसर आणि पर्यावरण प्रदूषण मुक्त असणे महत्त्वाचे आहे.

वेळोवेळी सर्वांनी आपली नियमित आरोग्य चाचणी करून घ्यावी व सीओपीडी आटोक्यात ठेवण्यात आपला हातभर लावावा.



डॉ. श्वेता राऊत मुळगावकर