मन म्हणजे नक्की काय याचं कोडं भल्याभल्यांना सोडवता आलं नाही आणि अजूनही ते अनुत्तरित राहिलंय. अशी ही न दिसणारी गूढ अस्वस्थ, अधीर, अफाट, अचाट, अचपळ अशी अनेक दूषणे आणि आभूषणे असलेली तरीही सर्वांना आकर्षण वाटणारी गोष्ट.
लहानपणी शाळेत आम्हाला चौथीपर्यंत रोज सकाळी आधी सगळ्यांनी एका मोठ्या हॉलमध्ये उभे राहून मनाचे पहिले वीस श्लोक म्हणायचे आणि नंतर आपापल्या क्लासमध्ये जायचे असा नियम होता. अर्थात ते वय मनाच्या श्लोकांचा अर्थ समजण्याचं नव्हतं पण ते तेव्हा पाठ झाले होते त्याचा उपयोग मात्र नंतर वेळोवेळी होत गेला.
मन म्हणजे नक्की काय? याचं कोडं भल्याभल्यांना सोडवता आलं नाही आणि अजूनही ते अनुत्तरित राहिलंय. अशी ही न दिसणारी गूढ अस्वस्थ, अधीर, अफाट, अचाट, अचपळ अशी अनेक दूषणे आणि आभूषणे असलेली तरीही सर्वांना आकर्षण वाटणारी गोष्ट. जिच्या आकर्षणात बुडालेले अगदी संतमहंत ही त्यापासून दूर राहू शकले नाहीत. समर्थ रामदासांनी आपल्या श्लोकातून मनाला उपदेश केला. त्यातला प्रत्येक श्लोक काहीतरी गहन अर्थ सांगतो. जीवन जगताना कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. एक प्रकारे मनाशी साधलेला तो संवादच आहे. मनाला संबोधित करताना त्यांनी ‘मना सज्जना’ असं म्हटलेलं दिसतं. मनाने कोणत्या परिस्थितीत काय करावं आणि काय करू नये याचं योग्य मार्गदर्शन समर्थ करतात. पहिल्या श्लोकात गणेशाला आणि सरस्वतीला जे विद्येचे मूळ मानले जातात त्यांच्या ठायी नमन करून सुरू झालेले हे श्लोक दोनशेचा आकडा पार करूनच थांबले असं म्हणतात समर्थांनी हे श्लोक एक रात्रीत लिहून पूर्ण केले, त्याला लिखित स्वरूप कल्याण स्वामिंनी दिले आणि नंतर ते सर्व रामदासी पंथाच्या मुखी बोलू लागले.
मन ही अशी गोष्ट जरा पण एका जागी थांबत नाही; सतत सर्वत्र संचार करायला मुक्त असते म्हणूनच त्यावर आवर घालता आले पाहिजे. त्याला योग्य ती दिशा दाखवली पाहिजे. भक्तिमार्गाने केलेली वाटचाल ही भक्ती पंथाकडे नेते ज्यामुळे परमेश्वराची कृपा प्राप्त होते. या भरकटत राहणाऱ्या मनाला चुकीच्या वाईट मार्गाने जाण्यापासून रोखावे लागते त्यासाठी आपल्यामध्ये असलेले जे सहा षड्रिपू आहेत त्यांच्यापासून समर्थ दूर राहायला सांगतात. लोक ज्याला वाईट मानतात त्या गोष्टींचा त्याग करून जे योग्य आहे त्याची कास धरली पाहिजे. माणसातले क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वासना हे सहा विकार त्याला विनाशाकडे नेणारे, मनात नकरात्मकता पसरवणारे असतात. म्हणून त्यापासून चार हात लांबच असावे.
मनाला संबोधून केलेला हा उपदेश म्हणजे माणसाला योग्य दिशेने जगण्याचे मार्गदर्शन करणारा राजमार्ग आहे. उपदेशात्मक असे हे काव्यलेखन मनाला जागं करण्याचं काम करतं. त्यात गेयता असल्याने लगेच मुखोद्गत होतं आणि लक्षात ठेवायला सोप्पं पडतं. आपलं वागणं कसं असावं आणि कसं नसावं याचं विश्लेषण समर्थांनी अगदी सोप्या रीतीने सर्वांना कळेल अशा भाषेत सांगितले आहे. मन अस्वस्थ होतं, विचलित होतं त्याला शांत ठेवण्यासाठी श्लोक मदत करतात. रोज प्रभाती मनात भगवंताचे स्मरण करावे म्हणजे दिवसाची सुरुवात चांगली होते. दिवसभर मनाला शुभ, मंगल वाटत राहतं. सदाचार म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागलं पाहिजे. आपण कसंही वागलं तरी लोक काही ना काही बोलतच असतात ते सहन करायचे धारिष्ट्य अंगी असावे त्यावेळी मन दुखावले जाते पण लोकांनी बोललेले ऐकून घ्यावे आणि स्वत: नम्र राहिलं तर आपल्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम होणार नाही.
जीवनामध्ये अशी कार्ये करावीत की आपल्या मृत्यूनंतर आपण कीर्तीरूपाने जनमानसात उरावे. चंदनासारखा आपला देह सत्कार्य करण्यासाठी झिजवत जगावं म्हणजे कामाचा दरवळ सगळीकडे पसरेल. आणि आपले कर्तृत्व लोकांच्या आपोआप लक्षात राहील. मनाला चंदनाची उपमा देण्याचे कारण चंदन वृक्ष मनात कोणाविषयी वैर धरत नाही त्याच्यावर वार करणाऱ्याच्या कुऱ्हाडीला ही सुवासिक करून जातो तसं ज्यांनी तुम्हाला वाईट वागणूक दिली त्यांच्याविषयी सुद्धा क्रोध धरू नये. जगात पाहायला गेलं तर सर्व बाजूंनी सुखी असा कुणीच नसतो. प्रत्येकाला काही ना काही पीडा, व्यथा, दुख हे असतेच. कमी जास्त प्रमाणात असतं इतकंच. आपण जे काम करतो त्याचे मूल्यमापन होत नाही, त्यात योग्य ती सफलता मिळत नाही म्हणून दु:ख, चिंता करत राहतो त्यापेक्षा आहे तो क्षण सुखाचा आहे हे मानणे योग्य ठरते. आपण व्यर्थ चिंता वाहण्यात आपला वेळ वाया घालवतो. जे घडणार आहे, जे आपल्या हातात नसते ते घडतच असते तेव्हा फारशी चिंता न करता आपले कर्तव्य करत राहणे हेच योग्य ठरते. उगाच दुःख आणि काळजी करत बसण्यापेक्षा विवेक बुद्धी वापरुन त्यावर विजय मिळवणं योग्य.
समर्थ म्हणतात, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण काही लोक त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्व ही सर्वांसाठी सारखेच आहे फक्त प्रत्येकाचं मन मात्र वेगवेगळ्या दिशेने विचार करणारं असल्याने तुम्ही त्यातून काय निवडता हे मनाने ठरवायचं असतं. त्यासाठी मन सक्षम असावं लागतं. मनाचे निमित्त करून जगाला चांगल्या वागण्याचा बोध देण्याचं काम समर्थांनी केलं. नीतीमत्ता सर्वथा न सोडता कसे वागावे याचे समर्थन केले आहे.
पहिले वीस श्लोक हे बाल संस्कारात योग्य ते मार्गदर्शक ठरतात. पण कधी कधी वाढलेल्या वयात कसे वागावे काय योग्य, काय अयोग्य याचा विसर पडलेला असतो. माणसांवरती त्याचे शत्रू म्हणजे मनातले षड्रिपू स्वार झालेले असतात अशा वेळी मार्गदर्शक ठरतात ते हे मनाचे श्लोक. वाईट विचारांना मनात थारा देऊ नये, मनात पाप बुद्धी उपजू नये म्हणून या श्लोकांचे सतत चिंतन मनन केलं पाहिजे. मनाची शक्ती अफाट आहे तिचा वापर चांगल्या कार्यासाठी करून घेता यावा यासाठी समर्थांचा हा खटाटोप.
क्रोध किंवा रागावर नियंत्रण ठेवणं सगळ्यात अवघड क्रिया. राग हा टाळणं अवघड असतं तो स्वत:लाही आणि समोरच्यालाही जाळतो. भान सुटते, म्हणून मनात जागरूकता असावी. आदर्श व्यक्तिने कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे त्याच्या प्रतिमेला तडा जाणार नाही हे सांगितले आहे. स्वत:ची अपकीर्ती होऊ नये यासाठी जपावे. आपल्या योग्य वर्तनाने स्वतःचा उत्कर्ष साधावा. सतकीर्ती वाढवावी त्यासाठी विवेकाची वाट धरावी. अशा या अचपळ, अस्थिर अशा मनाला स्थिर करायचं असेल तर राघवाचे ध्यान करा, त्याला शरण जा त्यानेच आपले मन शांत, समाधानी राहण्यास मदत होईल असे ते सांगतात. रामदास स्वामींचा हा मनाला उद्देशून केलेला बोध हा सर्वांच्याच आयुष्यात प्रकाश दाखवणारा एक प्रखर दीपक आहे. तो प्रज्वलित ठेवण्यासाठी लहानपणापासून त्याचे पाठांतर व्हायला हवे जसे आमच्या शाळेत होत होते.
प्रतिभा कारंजकर, फोंडा