घोकंपट्टी आणि शंभर टक्क्यांचं खूळ डोक्यात घेऊन कॉलेजमध्ये गेलेली मुले काही वेळा मनोरुग्ण झालेली मी पाहिली आहेत. कारण संकल्पना लक्षात न घेता फक्त पाने पाठ करून मोठ्या परीक्षा उत्तीर्ण होता येत नाहीत.
‘टीचर, माझे मार्क निबंधात का कमी दिले? मी मोठ्या उत्तरांना उत्तर लिहिले असले, तरी त्यात माझे मार्क का कापले गेले?’ असे आणि किती तरी प्रश्न घेऊन मुले आणि त्यांचे पालकही आपल्याकडे येताना दिसतात. ह्यात मुलांची काहीच चूक नसते. चूक असते ती त्यांच्या पालकांची. पालकांना स्वतःच्या मुलांना शंभर टक्के मार्क हवे असतात.
गणितात आणि काही अंशी विज्ञान विषयात शंभर टक्के मिळवणे शक्य आहे, पण हाच हट्ट जेव्हा भाषेकडे वळला तेव्हापासून तयार अश्या एकाच पठडीतील उत्तरांचा सपाटा सुरु झाला. त्यात अगदी लहान वयात लिहिताना चुकायचे नाही असे सांगितल्याने मुले स्वतःचं डोकं वापरून काहीच लिहिनाशी झाली. वळणदार व सुंदर अक्षर काढायचा अर्थ मुलांनी Readymade उत्तरच लिहायची असा समज करून घेतला. लहान वयात स्वतःच्या कल्पनाशक्तीला चालनाच न दिल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आकलन शक्तीवरही झालेला दिसतो. नुसती घोकंपट्टी करून लिहिण्यावर भर दिलेला दिसतो. असे करता करता जेव्हा मुले पुढे जातात, तेव्हा छपाई यंत्राप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कॉप्या निघालेल्या दिसतात. जेव्हा कल्पनाशक्ती वापरून competitive परीक्षांना बसायची पाळी येते, तेव्हा मात्र ते भांबावून जातात. एवढाच नव्हे तर घोकंपट्टी आणि शंभर टक्क्यांचं खूळ डोक्यात घेऊन कॉलेजमध्ये गेलेली मुले काही वेळा मनोरुग्ण झालेली मी पाहिली आहेत. कारण संकल्पना लक्षात न घेता फक्त पाने पाठ करून मोठ्या परीक्षा उत्तीर्ण होता येत नाहीत. पुढे पुढे तर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा स्वतःची कल्पना वापरून काम करण्याची वेळ येते, तेव्हा पार गडबडून जातात.
अक्षर सुवाच्य असावंच, पण म्हणून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व नवनिर्मितीला आळा बसू नये. पेपर तपासणे एक संघ व्हावे म्हणून शिक्षकही दबावाखाली तयार उत्तरे फळ्यावर देतात आणि तशीच उत्तरे उत्तर पत्रिकेत लिहिली जावीत असा अट्टाहास धरतात. ज्या मुलांना घोकंपट्टी जमली नाही, ती मुले कमी गुण मिळवतात किंवा नापास होतात. मुलांनीं घोकंपट्टी न करता दिलेली उत्तरे सगळीच चुकीची असतील असे नाही पण शिक्षक त्यांच्या दृष्टीने विचार करायची हिम्मत करत नाहीत.
तथाकथित मानक भाषेचं रूप तेव्हाच समृद्ध होतं जेव्हा ती भाषा बोलली जाते, लिहिली जाते. त्या भाषेतून विचार केला गेला पाहिजे व ती अंगवळणी पडली पाहिजे. ह्या अशा भाषेतून जेव्हा विचार होतो व लिहिलं जातं तेव्हाच त्यातून व्यक्त होणं कठीण होत नाही. ह्यातूनच नवनिर्मिती घडते व भाषा समृद्ध होते. टारझन हा वनमानव आपल्यासारखाच दिसत असला तरी फक्त जंगलातल्याच पशु-पक्षांची, झाडा-वेलींची भाषा ऐकत होता व तसेच बोलत होता.
माणूस जगण्याचा आनंद घेण्यासाठी जन्मतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुले. आपण जेव्हा लहान असतो, तेव्हा आपल्या गरजा कमी असतात तसेच तक्रारीसुद्धा कमी असतात. ज्या काही गरजा असतात त्या फक्त त्यांच्या स्वतःच्या असतात. त्या भागवल्या की हसायला, खेळायला मोकळे. मोठ्यांनी जर आपल्या आयुष्याचे गोड-कटू अनुभव वाजवीपेक्षा जास्त कानांवर लादले नाहीत, तर हीच मुले आपली वाट स्वत: शोधू शकतील. पालकांनी आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अपेक्षांचे ओझे जर मुलांवर लादले नाही, तर मुलांचे बालपण आणि निरागसपणा जपू शकतील. आपल्या वागणुकीतून त्यांना जर चांगल्या वाईट गोष्टींच्या मर्यादा दाखवून दिल्या तर मुले स्वत: आपल्यातील साधा, सरळ, सच्चा, समाधानी आनंदी माणूस जागवतील. त्याचवेळी चांगले कलाकार, वैज्ञानिक, व्यापारी, शेतकरी, शिक्षक तयार होतील. स्वतःचा आणि देशाचा विकास करतील.
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आपल्याला किती सुबक, आल्हाददायक मूर्ती बनवायची ते प्रत्येक पालकांवर अवलंबून आहे. हीच मूर्ती पुढे समाज घडवणार आहे, देश घडवणार आहे. घोकंपट्टीने, धाकदपटशाहीने, विचारांना चालना न देता फक्त शंभर टक्क्याचं खूळ बालमनाला एक यंत्र मानव बनवेल नाही का?
- अनिता कुलकर्णी