आर. राजेशची ट्रक सवारी

एक कुतूहल वाटायचे ट्रक चालकांबद्दल. त्यांचा अनेक दिवस, अनेक राज्यांतून चालणारा प्रवास, महामार्गाच्या बाजूला खास चालकांच्या पठडीचे असणारे ढाबे आणि कधीकधी प्रवासात असताना रस्त्याच्या कडेलाच चूल मांडून त्यावर अन्न शिकवणारे हे चालक.

Story: आवडलेलं |
09th November, 03:43 am
आर. राजेशची  ट्रक सवारी

आपल्याला बऱ्याचदा अनेक गोष्टींबद्दल, माणसांबद्दल कुतूहल वाटत असते. हे कुतूहल कधीकधी प्रत्यक्ष माणसांशी संवाद साधून, कधी त्यांच्याबद्दल वाचून, त्यांच्याबद्दलचा एखादा माहितीपट किंवा चित्रपट बघून किंवा कधी इतरांशी त्यांच्याबद्दल बोलून शमले जाते. कधीकधी यातल्या कोणत्याच गोष्टी शक्य होत नाहीत तर कधीकधी त्या अपुऱ्या पडतात. 

लहानपणापासूनच मला दोन प्रकारच्या लोकांबद्दल कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. एक म्हणजे, बांधकाम करणारे कामगार. बांधकाम चालू असेल तिथे जाऊन, तात्पुरती घरे बांधून राहणाऱ्या या कामगारांचे आयुष्य कसे असेल? लहानपणी त्यांच्या घसरगुंडीसारख्या असणाऱ्या, माती चाळायच्या चाळण्या मला फार आवडायच्या. दिवसभर त्यावर माती चाळणाऱ्या बायका संध्याकाळी आपापल्या तात्पुरत्या घराबाहेर बसून चूल पेटवून भराभर भाकरी थापायच्या तेही मला आवडायचे. 

असेच, अजून एक कुतूहल वाटायचे ट्रक चालकांबद्दल. त्यांचा अनेक दिवस, अनेक राज्यांतून चालणारा प्रवास, महामार्गाच्या बाजूला खास चालकांच्या पठडीचे असणारे ढाबे आणि कधीकधी प्रवासात असताना रस्त्याच्या कडेलाच चूल मांडून त्यावर अन्न शिकवणारे हे चालक. जरा विचार केला की जाणवेल, या दोन्ही गोष्टींमध्ये एक समान गोष्ट आहे; ती म्हणजे या लोकांची स्वयंपाक करण्याची पद्धत. बाहेर, उघड्यावर आहे त्या सामानात आणि आहे त्या परिस्थितीत स्वयंपाक कसा होत असेल? आपण वापरतो ती आधुनिक साधने न वापरता इतकेच काय फारसे मसालेही न वापरता ही मंडळी कसा स्वयंपाक करत असतील? माझ्यासारख्यांच्या अनेकांच्या मनातले असे प्रश्न जणू ‘युट्यूब’वरच्या प्रसिद्ध ब्लॉगर ‘आर. राजेश’ यांच्या मुलांनी ओळखले. ट्रक चालक असणारे आर राजेश आपण कुठे जात आहोत, आज काय जेवणार आहोत, यापुढे कुठल्या कंपनीचा माल ट्रकमध्ये भरून कुठे पोहचवणार आहोत हे सांगणारे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि घरी असणाऱ्या आपल्या मुलांना पाठवले. यातूनच त्यांच्या मुलांच्या डोक्यात युट्यूब चॅनलची कल्पना आली. त्यांनी ट्रक चालकाचे दैनंदिन आयुष्य चित्रित करायचे ठरवले. यातूनच जन्म झाला तो त्यांच्या चॅनेलचा. यामध्ये त्यांचा रोजचा प्रवास किती किलोमीटरचा असतो, कुठून ते कुठपर्यंत असतो, वाटेत काय अडचणी येतात, रात्री कुठे मुक्काम करतात अशा अनेक गोष्टी ते दाखवतात पण मुख्य आकर्षण असते ते राजेश यांच्या ट्रकमधल्या स्वयंपाकाचे. कधी ट्रक केबिनमध्येच तर कधी बाजूला गाडी थांबवून, चटई घालून रस्त्याच्या कडेला चालणारा त्यांचा स्वयंपाक बघायला अनेक जणांना आवडतो. त्यांची माहिती सांगायची पद्धत, बोलण्यात असणारी सहजता, स्वयंपाक करतानाचे तपशील आणि त्यांच्या मुलांची व्हिडिओ एडिट करण्याची पद्धत या सगळ्यामुळे फार कमी वेळातच यांच्या ब्लॉगला विलक्षण लोकप्रियता मिळाली. 

आपल्या प्रवासाची माहिती सांगताना इतर ट्रक चालकांना, विशेषतः नवीन, तरुण चालकांना काही गोष्टी सांगणे, सल्ले देणे अशा गोष्टी राजेश अगदी सहज करत असतात. आपल्या चॅनलची लोकप्रियता लक्षात घेऊन ते एखाद्या चालकाची अडचणही लोकांपर्यंत पोहचवतात. ते थांबत असलेल्या ढाब्याच्या मालकाचे, त्यांच्या मुलाचे कौतुक करतात. २५-३० वर्ष फक्त ट्रक चालवून आपले आणि आपल्या परिवाराचे पोट भरणारे राजेश नैसर्गिकपणे सहज आणि परवाही संवाद साधतात. त्यांच्या बरोबर जाणारी त्यांची दोन मुलेही वेगवेगळ्या कल्पना राबवून त्यांच्या चॅनलचे वेगळेपण टिकवून ठेवत. खरेतर, हेच त्यांच्या यशाचे कारण आहे. 

एरवी ट्रक चालकाच्या आयुष्यात काय चालते? ते कसे राहतात? त्यांची घरे कुठे असतात? किती महिने बाहेर असतात? कसे राहतात? असे अनेक प्रश्न पडत असले तरीही या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला नसता. याबद्दल काही वाचायला मिळाले असते तर वाचले असते पण मुद्दाम शोधले नसतेही कदाचित. आपल्या हातात असणाऱ्या या मोबाइलमुळे काही गोष्टी किती आपल्याला सहज उपलब्ध झाल्या आहेत हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. देणारा आणि घेणारा यामधले अंतर इतके कमी झाले आहे.


- मुग्धा मणेरीकर