विष्णूप्रिया तुळशीमाता

विष्णुप्रिया तुळशीमातेला प्राचीन काळापासून भारतीय हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. शुभ मानले जाणारे तुळशी वृंदावन भारतीय संस्कृतीचे पारंपरिक असे प्रतीक आहे. तुळशी वृंदावनाला लक्ष्मी मानतात व तुळशी वृंदावन दारात असेल तर वास्तुचे दु:ख निवारण होते अशी धार्मिक भावना आहे. म्हणूनच नवीन घर बांधताना घराच्या अंगणात तुळशी वृंदावनाची स्थापना केली जाते.

Story: विशेष |
16th November, 03:36 am
विष्णूप्रिया तुळशीमाता

तुळशी विवाह अर्थात 'व्हडली दिवाळी' अगदी थाटामाटात पार पडली. प्रती वर्षी आम्ही आमच्या वाड्यावरील मंडळी एकत्र येऊन अगदी प्रत्येकाच्या घरी तुळशी लग्नाला जावून आरत्या म्हणून, प्रत्येक घरचा प्रसाद खाऊन हा तुळशी विवाह साजरा करतो. या वर्षी सुध्दा तुळशी विवाह अगदी थाटामाटात पार पडला. सारी आवराआवर करताना मी आनंदाने, समाधानाने तुळशी वृंदावनाकडे बघतच राहिले. तुळशी विवाहाच्या निमित्ताने सजलेले लाल रंगाच्या ‘पेवसाचे’ अंगण खूप सुंदर दिसत होते. रांगोळी, पणत्यांनी सजलेले तुळशी वृंदावन खूप सुंदर दिसत होते. 

उंबरठ्यापाशी, तुळशी वृंदावनापाशी अंगणात मी छान रांगोळी घातली होती. या अंगणातले तुळशी वृंदावन आणि माझे एक अतूट नातं. बालपणी घरची कन्या म्हणून आणि आज आता सासरी घरची सून म्हणून या तुळशीचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. माझ्या बालपणी माझ्या आईची एक शिस्त होती. घरातल्या पोरीने रोज सकाळी तयार होऊन शाळेला निघताना देवाला, तसेच अंगणातल्या तुळशी वृंदावनालाही एक प्रदक्षिणा घालून नमस्कार करून मग शाळेला निघायचे. पुढे मग शाळेला, कॉलेजला, ऑफिसला सुट्टी असली तरी ही परिक्रमा आम्ही घरच्या पोरींनी अगदी लग्न होईपर्यंत कधीच चुकवली नाही. माझ्या आईची देवावर आपार श्रद्धा होती पण ती अंधश्रद्धाळू मात्र नक्कीच नव्हती. रोजच्या सकाळच्या आंघोळीनंतर ती देवघरातील देवाला, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनाला हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करायची. कधी माझ्या घरी आली तरी देवपूजा, तुळशीपूजा करूनच मग दुपारचे भोजन ग्रहण करायची. तिच्या जीवनातील आयुष्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा तिने देवपूजा, तुळशी वृंदावन पूजा केली. ती श्रावण मासांतील शुक्रवारी आम्हाला सोडून देवा घरी निघून गेली. नकळत माझ्या मनातही तुळशी मातेबद्दल जी श्रद्धा होती, ती द्विगुणीत झाली. 

प्रत्येक वर्षी दिवाळीला आम्ही न चुकता अंगणातील तुळशी वृंदावनाची छानपैकी रंगरंगोटी करतो. तुळशी मातेला सजवतो. दीपावलीच्या इतर सणाबरोबर तुळशी विवाह खूप दणक्यात साजरा करतो. तुळशी वृंदावन म्हणजे अंगणाची शोभा. तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी रूप मानले जाते. पुराण कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर सांडले व त्यातून तुळस निर्माण झाली म्हणून तुळशी रोपाला 'संजीवनी' म्हणतात. माझ्या बालपणी प्रत्येक घरादाराच्या पुढच्या शेणाने सारवलेल्या अंगणात एक सुंदर तुळशी वृंदावन दिमाखात उभे असायचे. आजही खेड्यामधल्या प्रत्येक घरासमोर अशी सुंदर तुळशी वृंदावने आपल्याला पाहायला मिळतात. 

तिन्ही सांजेला तुळशी वृंदावनापाशी लावलेली तेलवात पवित्रता, प्रसन्नता निर्माण करते. त्या काळात माझ्या खेड्यात वीज होती पण आजच्यासारखा विजेचा झगमगाट नव्हता. रस्त्याने सायंकाळी घरी चालत जाताना उदबत्तीच्या सुगंधात तुळशीपाशी तेवणारी ती मंद वाद पाहताच त्या पवित्र वातावरणात नकळत दोन्ही हात जोडले जायचे. नकळत मुखातून शब्द यायचे, ‘दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार’. अशा विष्णुप्रिया तुळशीमातेला प्राचीन काळापासून भारतीय हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. शुभ मानले जाणारे तुळशी वृंदावन भारतीय संस्कृतीचे पारंपरिक असे प्रतीक आहे. तुळशी वृंदावनाला लक्ष्मी मानतात व तुळशी वृंदावन दारात असेल तर वास्तुचे दु:ख निवारण होते अशी धार्मिक भावना आहे. म्हणूनच नवीन घर बांधताना घराच्या अंगणात तुळशी वृंदावनाची स्थापना केली जाते. तुळशीला पापनाशिनी मानले जाते. औषधी वनस्पतीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशी रोपात भरपूर औषधी गुणधर्म असल्याकारणाने आयुर्वेद शास्त्रातही तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पती शास्त्रज्ञाच्या मतानुसार तुळस दिवसात २३ तास ऑक्सिजन हवे सोडत असते. तुळशीच्या हवेने किंवा वाऱ्याने सभोवतालची हवा निर्जंतुक व शुद्ध होत असते म्हणूनच तुळशीला नॅचरल फिल्टर म्हटले जाते. दारात तुळशीची रोपे लावल्याने घरात ऑक्सिजनची कमतरता होत नाही. तुळशीच्या सहवासाने माणसाचा सकारात्मक दृष्टिकोन प्रबळ होतो. व्यक्ति मानसिक दृष्ट्या प्रबळ होते. तिच्या पावित्र्याने मानवी जीवन सुकर होते. 

तुळशीच्या रोपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीच्या पानांचे नित्यनेमाने सेवन केल्याने अनेक आजारापासून सुटका मिळते. तुळशीमध्ये असलेल्या बहुमूल्य औषधी गुणधर्मामुळे गंभीर रोगाशी देखील सामना करणे सोपे जाते असे आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले आहे. तुळशीच्या अलौकिक गुणधर्मामुळे घरातल्या मंडळींचा, खास करून घरच्या स्त्रियांचा या तुळशी रूपाशी रोज संपर्क करावा म्हणून दारात तुळशी वृंदावनाची पारंपरिक संकल्पना आपल्या पूर्वजांनी राबवली असावी. श्रीविष्णू देवाला लक्ष्मी रुपी तुळस अत्यंत प्रिय म्हणून तुळशीला स्थान आहे. श्री नारायण अवतारातील स्वरूपांना तुळशी वाहिल्या जातात. विठोबा, जगन्नाथ, श्रीकृष्ण भगवान या साऱ्या देवांची पूजा तुळशीपात्र समर्पणाशिवाय पूर्ण होत नाही. तुळशीला लक्ष्मी मानतात म्हणून तिची पूजा केली की नारायण प्रसन्न होतात असे म्हणतात. ज्या घरात नित्यनेमाने देवपूजा, तुळशी वृंदावन पूजा होते त्या घरावर एखादे संकट येणार असेल तर तुळशी माता संकेत देते असे म्हणतात. 



शर्मिला प्रभू 

फातोर्डा मडगाव