कर्तव्यपूर्तीची नशाच एक वेगळी असते हो! आणि त्यात सफलता मिळाली तर दुधात साखर. आपण एखाद्या बाबीत पुढाकार घेतो व ते कार्य व्यवस्थित पार पडते या सारखे सुख नाही बघा!
बी.एड.च्या पहिल्या वर्षाला असतानाची गोष्ट... साधारणत: ऑक्टोबरमध्ये आम्ही सर्वप्रोजेक्टसाठी मॅडमसहित मुरबाडला पोहोचलो. आमच्या राहण्याची, जेवणाची सर्व सोय गावात चोख केली होती. त्या काळी हा बराचसा भाग अगदी मागासलेला. कसल्याही सोयी, सुविधा नसलेला असा आदिवासी बहुल होता. सरकारी लोकप्रतिनिधींची अनास्था नेहमीचीच. दोन वेळच्या अन्नाची मारामार, तर शिक्षणाचा संबंध काय?
दुसऱ्या दिवशी सरपंच स्वत: आम्हाला घेऊन पाड्यावर गेले. पाड्यावर एका गोठ्यात एक फळा आणि एक पट्टी हया जामानिम्यानिशी शाळा सजली होती. मुले इनमीन सहा ते सात. ती सुध्दा अनियमित. लोकांकडून शाळा साफ करुन घेतल्यावर मुलांना गोळा करून वर्ग भरवणे चालू झाले. हळूहळू प्रतिसाद मिळू लागला.
एक दिवस असेच पंचायत ऑफिसमध्ये बसलो असताना एक आदिवासी कार्यकर्ता एका छोट्या मुलीला घेऊन आला. असेल साधारण आठ ते नऊ वर्षांची. सावळी असली तरी काटक अंगकाठीची. सरपंच व तो कार्यकर्ता यांच्यात काही संभाषण झाले. तो माणूस मुलीला आमच्याकडे ठेवून गेला. नंतर सरपंचाने सांगितले की तिला कुणीच नाही. बाप दोन वर्षापूर्वी दारु पिऊन मेला आणि आई रानात लाकडे आणायला गेली ती बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडली. पोर बिचारी उघड्यावर पडली. दोन दिवस शेजारच्या झोपडीत आश्रय मिळाला. पण एकादशीच्या घरी संकष्टी असा प्रकार. सगळेच उपाशी. कोण कोणाला सांभाळणार? शेवटी तिची रवानगी सरपंचाकडे झाली.
सरपंच तसा कनवाळू माणूस. आम्ही असेपर्यंत मुलगी राहूदे असे त्याचे म्हणणे पडले. काय बोलणार? झाले... रोज पाड्यावर आमच्या बरोबरच ती मुलगी येई. विद्यार्थ्यांबरोबर राहून संध्याकाळी परत आमच्या बरोबर येई. हळूहळू आम्हालाही, विशेषत: मला तिचा खूप लळा लागला. पोर होतीच तशी गुणी. आठ दिवसापूर्वी गेलेल्या आईचे दु:ख दूर सारून ती लगेच आमच्याशी समरस झाली होती. परिस्थिती माणसाला कशी घडवते नाही?
होता होता १५ दिवस उलटले. आमचा प्रोजेक्ट कॅम्पही संपत आला. आता परतीचे वेध लागले. पण त्याच बरोबर राविची चिंताही भेडसावू लागली. अरे हो सांगायचे राहिले, ती मुलगी म्हणजेच रावी. शेवटी सरपंचाबरोबर बोलून ठरविले की काही दिवस तिला अंगणवाडी सेविकेकडे ठेवायचे. नंतर बघु. तिच्या नातेवाईकांशी बोलून घेतले. ते लगेच तयार झाले. आणि शेवटी कोण सांभाळणार हो आईविना लेकरू? आलो परत आम्ही.
रूटीन सुरु झाले. घर, संसार, कॉलेज अगदी पॅक. पण तरी निवांत बसल्यावर राविची आठवण यायचीच. काय करत असेल पोर? काय खात असेल? अर्थात आमचा सरपंचावर पूर्ण विश्वास होता पण तरी सुध्दा स्वस्थ बसवेना. मग एक दिवस मॅडमने फोन लावला सरपंचाला. आम्ही स्वत: बोललो राविशी. ठीक वाटली. पण शाळेत जायला मिळत नाही असे म्हणत होती. तसे सरपंचालाही मर्यादा होत्या. उद्या काही बरे वाईट झाले तर काय? शेवटी सर्वानुमते असे ठरले की तिला एखाद्या अनाथालयात ठेवायचे.
आमच्या मॅडमच्या ओळखीतून एका सेवाभावी संस्थेने तिची पूर्ण जबाबदारी उचलली. आम्ही खूश झालो. मी स्वत: मुरबाडला जाऊन तिला नाशिकच्या संस्थेत दाखल केले. आधीच ऋणानुबंध जुळल्यामुळे रावी खूश होती माझ्यावर. मी सांगितल्यावर संस्थेत राहायला लगेच तयार झाली. महिन्यातून एकदा मी अन मॅडम नाशिकला जात असू. तेवढीच राविची भेट व्हायची व एखादा छोटासा प्रोजेक्टही व्हायचा. राविची प्रगती कळत होती. भेट झाली नाही तरी फोन, पत्रव्यवहार चालूच होते एकमेकांचे.
संस्थेत रावी खूप हुशार म्हणून प्रसिद्ध होती. अभ्यासात विशेषत: संगणक शास्त्रात तिला चांगलीच गती होती. संस्था संचालिकाही तिच्यावर खूश असत. आमचा संपर्क तसा चालूच होता. होता होता रावी संस्थेतून १२वी पास झाली. नुसते चांगले गुणच नाही, स्कॉलरशिपही मिळाली तिला. पुढील शिक्षणाकरिता बंगलोरला जायचे होते. मी स्वत: तिला घेऊन गेले तिकडे. रीतसर प्रवेश घेऊन वसतिगृहातही सोय केली तिची. परत जाताना खूप रडली रावी. “तुमच्यामुळे इथे आले, नाहीतर सडत पडली असती पाड्यावर.” असे सारखे सांगत होती. बंगलोरवरूनही आमचा पत्रव्यवहार चालूच होता. पण आता भेट तशी कठीणच झाली होती. प्रगती कळत होती. पदवीधर झाली ती. मी मुद्दाम गेले होते पदवीदान समारंभाला.
लहानशी, लाजरी बुजरी, गोंधळलेली अशी रावी आता एक होतकरू तरुणी झाली होती. अभ्यासात यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करत होती. प्रत्येक वेळेस मला न विसरता कळवायची खुशाली. ‘ब’ म्हणते ती मला. ‘ब’ म्हणजे गावरान बोली भाषेत ‘आई’ असा अर्थ होतो आणि खरंच तिची ब गेल्यानंतर कोण होती तिला?
यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला अमेरिकेत एका कंपनीत नोकरी मिळली. खूश झाली. मुंबईला आली माझ्याकडे, राहिली दोन दिवस. जशी काय माहेरवाशीण येते तशीच. मीही खूप खूश झाले. दोन दिवस राहिली आणि गेली परदेशात भुर्रकन उडून.
आज पाच वर्षांनी माझी लाडकी रावी परत येतेय अमेरिकेहून. ती सुध्दा साधी सुधी नाही, तर एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करत येतेय. ती ज्या कंपनीत काम करते ती सामाजिक कार्यातही खूप पुढे आहे. त्यांच्या मीटिंगमध्ये राविने एक प्रबंध वाचला होता. त्यावेळेस तिची जीवनकहाणी त्यांना कळली. खूप प्रभावित झाले ते. भारतात अश्या काळाच्या गर्तेत सापडलेल्या तरुणांचे गुण हेरून त्यांना व्यासपीठ द्यायचे काम त्यांची संस्था करते. त्याच कामाकरता रावी येत होती.
एअपोर्टवर सर्व सोपस्कार झाल्यावर रावी समोर आली आणि घट्ट मिठीच मारली तिने मला. तिच्या स्वागताला आलेल्या सर्वांना मी कोण ते मोठया गर्वाने सांगितले, आणि मला म्हणाली, “ब, तुझ्यामुळे शक्य झाले हे. आज तू जे माझ्याकरता केलेस त्यांची परतफेड करायला आले मी. आता बघ कसे हिरे शोधून काढते ते.” एका ध्येयवादी, ताकदवान स्त्रीचे बोल होते ते. रावी ती, संकल्प पुरा करणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. नव्हे, १००टक्के गॅरंटी.
कर्तव्यपूर्तीची नशाच एक वेगळी असते हो! आणि त्यात सफलता मिळाली तर दुधात साखर. आपण एखाद्या बाबीत पुढाकार घेतो व ते कार्य व्यवस्थित पार पडते यासारखे सुख नाही बघा! पैसा, ऐश्वर्य सगळे फिके पडते त्याच्यापुढे. खरंच आज मी खूप खूश आहे फक्त रावीमुळे नाही, तर ध्येयपूर्तीमुळे.