बार्देश : उच्च न्यायालयाचे बनावट निवाडापत्र तयार करणाऱ्या क्रेग फ्रॅन्क जेन्सनवर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November, 03:11 pm
बार्देश : उच्च न्यायालयाचे बनावट निवाडापत्र तयार करणाऱ्या क्रेग फ्रॅन्क जेन्सनवर गुन्हा नोंद

म्हापसा  :  हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणाचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे बनावट निवाडापत्र तयार करत न्यायालयानेच तक्रार फेटाळळून अटक वॉरेंट जारी केल्याचे भासवल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी क्रेग फ्रॅन्क जेन्सन (रा. बंगळूरू कर्नाटक)विरुद्ध बनावटगिरीचा गुन्हा नोंद केला आहे. 

 याप्रकरणी,  फिर्यादी आदेरिटा कोचरेन जेन्सन (रा. बंगळूरी कर्नाटक) यांनी २०२० साली  संशयित आरोपी दीर क्रेग फ्रॅन्क जेन्सन व सासू विरूध्द हुंड्यासाठी छळ चालवल्याची तक्रार पर्वरी पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.सं.च्या ४९८  कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता. तसेच याप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या गुन्ह्यावेळी फिर्यादी व संशयित आरोपी पर्वरी परिसरात वास्तव्यास होते.  

   दरम्यान संशयित आरोपीने या खटल्याचे उच्च न्यायालयाचे बनावट निवाडापत्र तयार केले. फिर्यादींची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच त्यांना अटक वॉरंट जारी केले असल्याचे या आदेशपत्रात नमुद करण्यात आले होते. संशयिताने नंतर हे बनावट आदेशपत्र फिर्यादींच्या ओळखीच्या रीचर्ड पॅट्रीग या व्यक्तीला वॉटस्अ‍ॅपवर पाठवले. रीचर्ड पॅट्रीगने फिर्यादींना याची माहिती दिली.

दरम्यान त्यांनी याबाबत पर्वरी पोलिसांशी सपर्क साधत शहानिशा केली असता सदर आदेशपत्र बोगस असल्याचे समजले. त्यामुळे फिर्यादींनी संशयिताविरूध्द तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय सहिंतेच्या ३३६ (२), ३३६(३) व ३४० (२) कलमान्वये बनावटगिरीचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरूण शिरोडकर हे करीत आहेत.  


हेही वाचा