टोंक पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान आपली सेवा बजावणाऱ्या एसडीएम (उपविभागीय दंडाधिकारी) ला थप्पड मारणारे अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. यापूर्वी टोंकमधील सामरावता गावात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याचे समोर आले होते. अजूनही हिंसाचार सुरुच आहे.
देवली उनियारा : निवडणुकीदरम्यान उमेदवाराने अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे काही नवीन नाही. मात्र राजस्थानमधील टोंकमध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या कृत्यामुळे हिंसाचार उफाळून आला आहे. माहितीनुसार, देवली-उनियारा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी) अमित चौधरी यांना थप्पड मारली.
यानंतर नरेश मीणा समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करताच नरेश मीणा यांना त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळापासून दूर नेले. पोलिसांनी नोटीस जारी करत नरेश मीणा यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मीणा या नोटीशीला बधले नाहीत. अखेर आज गुरुवारी सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली. तत्पूर्वी, काल रात्रभर टोंकच्या समरवता गावात गोंधळ सुरूच होता, याचेच पर्यावसान नंतर हिंसाचारात झाले.
जाणून घ्या सविस्तर
बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी एसडीएम अमित चौधरी यांना थप्पड मारली. यावेळी पोलिसांनी मीना यांना धक्काबुक्की केली. काही वेळानंतर नरेश यांचे समर्थक मतदान केंद्रासमोर धरणे धरून बसले. बूथसमोरून जमाव हटवण्यासाठी पोलीस आले असता समर्थकांनी दगडफेक केली. काही वेळातच अनेक वाहनांना आग लावण्यात आली. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत १० हून अधिक पोलीस तसेच अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. रात्री उशिरा या भागात इंटरनेट बंद करण्यात आले. गुरुवारी सकाळी एसटीएफने सामरावता गावात गस्त वाढवली.
बुधवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी नरेश मीणाला ताब्यात घेतले. मात्र, शेवटच्या क्षणी मीणाच्या समर्थकांनी तेथे पोहोचून त्याची सुटका केली. नरेश मीणा गुरुवारी सकाळी पुन्हा गावात पोहोचले. पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप केला. मी आत्मसमर्पण करण्यास तयार आहे, मात्र पोलिसांनी माझ्यावरही अन्याय केला आहे, असे मीणा म्हणाले. यानंतर मीना यांच्या समर्थकांमध्ये आणखी संताप पसरला, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
आता गावात हिंसाचार उफाळला असून एकीकडे देवळी-उनियारा येथील ग्रामस्थ नरेश मीणा यांच्या बाजूने दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सर्व आरएएस अधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी नरेश मीणा यांच्या विरोधात दिसत आहेत. नरेश मीणाला अटक करण्याच्या मागणीवर पोलीस-प्रशासन ठाम असताना ग्रामस्थ नरेश मीणा यांना संरक्षण देत होते. पोलिसांनी गावात घुसून लोकांना मारहाण केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
पोलिसांनी बुधवारी रात्री संपूर्ण सामरावता आणि परिसरात छापे टाकले. आतापर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापटही झाली. या गोंधळात ५० हून अधिक ग्रामस्थ आणि पोलीस जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी त्यांची वाहने पेटवून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला. अनेक मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्यानंतर सामरावता गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक गावकरी तलावात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांनी गाव सोडून पलायन केले आहे.
एसडीएमवरील हल्ल्यानंतर राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) असोसिएशनने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. जोपर्यंत नरेश मीणाला अटक होत नाही आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री होत नाही तोपर्यंत सरकारी कामावर बहिष्कार टाकला जाईल, असे आरएएस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर खराडी यांनी सांगितले. आरएएस सचिवालयातील अधिकारी सध्या बेमुदत संपावर गेले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथील गांधी पुतळ्याजवळ जमून आपल्या मागण्या मांडल्या. यासोबतच तहसीलदार सेवा परिषद, पटवार युनियन, सचिवालय कर्मचारी युनियननेही मिणावर कडक कारवाईची मागणी केली.
महानिरीक्षक ओमप्रकाश यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अपक्ष उमेदवार नरेश मीणा व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , प्रशासनाने उनियारा गावाचे नगर किल्ला तहसीलमध्ये केलेले हस्तांतरण हे त्यांच्या विरोधाचे कारण ठरले आहे, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला होता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील ग्रामस्थांसाठी हे अडचणीचे ठरत आहे. कारण नगर किल्ल्याचे अंतर सुमारे २५-३० किलोमीटर आहे तर उनियारा जवळ आहे.
या मुद्द्यावरून बुधवारी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी ग्रामस्थांच्या समर्थनार्थ धरणे धरण्याचा निर्णय घेतला व मतदान केंद्रावर बळजबरीने मते टाकली जात असल्याचा आरोप केला . समजावून सांगण्यासाठी आले असता नरेश मीणाने एसडीएमला थप्पड मारली. तुम्ही (एसडीएम) राजकीय अजेंडा ठेऊन काम केल्यास परिणामास सामोरे जावे लागेल, अशी धमकीही दिली.