उत्तर प्रदेश : मथुरेतील इंडियन ऑईल रिफायनरीत भीषण स्फोट; व्यवस्थापकासह १२ जण जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th November, 11:43 am
उत्तर प्रदेश : मथुरेतील इंडियन ऑईल रिफायनरीत भीषण स्फोट; व्यवस्थापकासह १२ जण जखमी

मथुरा : मथुरेत मोठी दुर्घटना घडली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रिफायनरीमध्ये मंगळवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा  आवाज १ किमी दूरपर्यंत ऐकू आला. दरम्यान स्फोटानंतर लागलेल्या आगीत १२ जण होरपळले. सध्या प्लांटमधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. 


मथुरेच्या रिफायनरी प्लांटमध्ये मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या रिफायनरीचा एबीयू प्लांट ४० दिवस बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर त्यात गळती झाल्याने स्फोट झाल्याचा अंदाज आहे. सर्वात आधी गळतीमुळे फर्नेसचा स्फोट झाला. त्यानंतर प्लांटला आग लागली. याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. प्लांटमध्ये काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे १२ जण जखमी झाले आहेत. प्रॉडक्शन मॅनेजर राजीव यांचाही जखमींमध्ये समावेश आहे. काही जखमींना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचाही शोध घेतला जात आहे.

स्फोटादरम्यान काढलेले हे छायाचित्र आहे. स्फोटानंतर प्लांटला आग लागली.


प्लांटमधील स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरला आणि स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे लोक घराबाहेर पडले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीत गंभीर भाजलेल्या तीन जणांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतरांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय सेवा दिली जात आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्लांट आणि यंत्रसामग्रीचे कोणतेही नुकसान झाले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, अशा आशयाची  एक प्रेस नोट बुधवारी रिफायनरीने जारी केली आहे. 


जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी बाहेर उभे असलेले दिसले.


हेही वाचा