फरार सिद्धीकीच्या कर्नाटकात एसआयटीने आवळल्या मुसक्या

जमीन हडप प्रकरण : म्हापसा पोलिसांनी केली होती ‘लुकआऊट’ नोटीस जारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th November, 05:40 am
फरार सिद्धीकीच्या कर्नाटकात एसआयटीने आवळल्या मुसक्या

म्हापसा : एकतानगर हाऊसिंग बोर्ड, म्हापसा येथील २०.८१९ हजार चौरस मीटर जमीन हडप केल्याप्रकरणी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) सराईत संशयित आरोपी सिद्धीकी उर्फ सुलेमान खान याला अटक केली. संशयित आरोपी २०२२ पासून फरार होता. त्याच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली होती.

म्हापसा पोलिसांनी दि. १९ सप्टेंबर २०२० रोजी संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४१९, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७२ व ४२० कलमान्वये बनावटगिरीद्वारे जमीन हडपचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मार्च २०२२ रोजी सिद्धीकीविरुद्ध ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली होती. नंतर हे प्रकरण जमीन हडप संबंधित विशेष चौकशी पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. नंतर एसआयटीचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवार, दि. १२ रोजी कर्नाटकमध्ये संशयिताच्या मुसक्या आवळून अटक केली. म्हापसा प्रथमश्रेणी न्यायाधीश गिरीजा गावकर यांनी संशयिताला ९ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

याप्रकरणी तत्कालिन बार्देश उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली होती. एकतानगर हाऊसिंग बोर्ड मधील म्हापसा शहर चलता क्रमांक २, पीटीशीट क्र. ६७ मधील २० हजार ८१९ चौरस मीटर जमीन उपनिबंधकांचा बनावट रब्बर स्टॅम्पचा वापर करून बनावट कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासविले व जमीन संशयित सिद्धीकी सुलेमान याने इतर संशयितांच्या सहाय्याने उपनिबंधक कार्यालयाकडून आपल्या नावावर केली होती.

एप्रिल २०२० पूर्वी हा प्रकार घडला होता. सदर जमिनीतील संशयिताने जुने घर जमिनदोस्त करून त्या जागी नवे बांधकाम सुरू केले होते. तसेच जमिनीचे भूखंड तयार करून ते विक्रीस काढले होते. हा प्रकार जमिनीचे वारसदार लिना डिसोझा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माहिती हक्क कायद्याखाली अर्ज करून उपनिबंधक कार्यालयातून जमिनीविषयीची माहिती मिळवली.

उपनिबंधकांचा बनावट रब्बर स्टॅम्प तयार केला. १९९७ मधील मुळ जमीन विक्री पत्रातील कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि मुळ मालकांंची नावे गाळून आपली नावे चढविली. मूळ मालकांचा मालकी हक्क हिसकावून घेतल्याचा प्रकार समोर आला होता.

पोलीस चौकशीत हा बनावटगिरीचा प्रकार संशयित सिद्धीकी उर्फ सुलेमान खान याने केल्याचे उघडकीस आले होते. संशयिताचा थांगपत्ता लागत नसल्याने म्हापसा पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुरूवार, दि. ३१ मार्च २०२२ रोजी लुटआऊट नोटीस जारी केली होती.

सुलेमान खानचे कारनामे

- सिद्धीकी उर्फ सुलेमान खान याच्याविरुद्ध राज्यात ७ गुन्हे नोंद आहेत. यातील म्हापसा व वाळपईमध्ये जमीन बळकावण्याचे पाच गुन्हे, हणजूणमध्ये खून व म्हापशात खूनी हल्ला या गुन्ह्यांचा समावेश आहे.

- सिद्धीकीविरुद्ध दिल्लीमध्ये देखील गुन्हे नोंद असून दिल्ली पोलिसांनी त्याची म्हापसा व गोव्यातील इतर भागातील मालमत्ता गोठवलेली आहे.

- जुलै २०१४ मध्ये विषारी इंजेक्शन आणि गळा दाबून कुंभारवाडा हणजूण येथील श्रीमती लुईझा लिगोरीओ फर्नांडिस (७०) हिचा खून आणि तिची भावजय तेरशीला फर्नांडिस (५५) हिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणात २०१८ मध्ये त्याला हणजूण पोलिसांनी अटक केली होती. २०१९ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.

हेही वाचा