दिल्ली : दिल्लीत गेल्या ९ दिवसांत ७ गोळीबाराच्या घटनांमध्ये ६ जण ठार; सरकार आणि पोलीस हतबल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th November, 01:19 pm
दिल्ली : दिल्लीत गेल्या ९ दिवसांत ७ गोळीबाराच्या घटनांमध्ये ६ जण ठार; सरकार आणि पोलीस हतबल

नवी दिल्ली : दिल्लीत गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. दररोज होणाऱ्या गोळीबारामुळे सामान्य लोकांत दहशत निर्माण झाली आहे. धक्कादायक आकडेवारीनुसार गेल्या नऊ दिवसांत दिल्लीत ६  जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. येथील ज्योती नगर आणि कबीर नगर परिसर रात्री उशिरा गोळीबाराच्या घटनांनी हादरला. कबीरनगर भागात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी स्कूटरवरून जाणाऱ्या तीन मित्रांवर गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

तर दुसरी घटना ज्योतीनगर परिसरात घडली. येथे हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने कोणाला गोळी लागली नाही. दोन्ही घटना एकमेकांपासून अगदी हाकेच्या अंतरावर  आहेत. पोलीस  या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने तपासकार्य करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत या प्रकारांवर सरकार व पोलिसांद्वारे  नियंत्रण का ठेवले जात नाही, हा सर्वात मोठा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. 

गेल्या नऊ दिवसांत या ठिकाणांवर गोळीबार झाला आहे

१) ज्योती नगरमध्ये गोळीबार: 

दिल्लीतील ज्योती नगर भागात रात्री उशिरा ३ हल्लेखोरांनी एका घराबाहेर अर्धा डझन गोळ्या झाडल्या. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात आधी गोळीबार झाल्यानंतर काही वेळातच स्कूटरवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी जिल्ह्यातील ज्योती नगर भागात एका घराबाहेर सहा राऊंड गोळीबार केला. दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहेत. ज्योती नगरमध्ये कुणालाही गोली लागली नाही. दरम्यान गोळीबार करणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे.

२) वेलकम एरियात तरुणावर गोळीबार : 

ईशान्य दिल्लीच्या वेलकम पोलीस हद्दीअंतर्गत येणाऱ्या कबीर नगर परिसरात ८ नोव्हेंबरच्या रात्री कारखान्यातून जेवण घेण्यासाठी स्कूटरवरून घरी जात असलेल्या तीन मित्रांवर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन तरुणांना गोळी लागली. जखमींना रुग्णालयात  नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले. नदीम असे मृताचे नाव आहे. वैयक्तिक शत्रुत्व, तसेच दरोडा यासह अन्य अंगांनी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, नदीमचे कोणाशीही वैर मात्र तो हल्लेखोरांपैकी एकाला ओळखत होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

३) छावला येथे गोळीबार :

 दिल्लीतील छावला येथे ६ नोव्हेंबर रोजी गोळीबाराची घटना घडली. शूटर्सनी मारुती वर्कशॉपवर सुमारे चार राऊंड गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कुख्यात गुंड कपिल सांगवान उर्फ ​​नंदू गँगचे सदस्य सहभागी होते. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी मारुती वर्कशॉपचे मालक जोगिंदर यांना धमकावले आणि तेथून निघून गेले. या प्रकरणी बदमाशांनी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

४) मीरा बागमध्ये गोळीबार :  

दिल्लीतील मीरा बाग परिसरात ६ नोव्हेंबर रोजीच भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. मीरा बागच्या राज मंदिर मार्केटमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. येथे  सुमारे ८  ते ९  राउंड गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी आरोपींनी घटनास्थळावरून सहज पळ काढला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कुणालाही इजा झालेली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

५) सोनिया विहार परिसरात मेव्हण्यावर गोळी झाडली:

ईशान्य दिल्लीतील सोनिया विहार परिसरात भाऊ बीजेच्या दिवशी दोन मेव्हण्यांमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान एका मेव्हण्याने दुसऱ्या मेव्हण्याला गोळ्या घालून ठार केले. ३५ वर्षीय हेमंत असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायावरून दोघांमध्ये भांडण झाले, त्यात अजयने हेमंतवर गोळी झाडली. एक गोळी हेमंतच्या डोक्यात तर दुसरी छातीत लागली. घटनेपासून आरोपी फरार आहे. त्याच्यावर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

६ ) शाहदरा येथे २०  वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या: 

शाहदरा येथील गांधी नगरमध्ये एका २० वर्षीय मुलाची त्याच्या मित्रांनी गोळ्या झाडून हत्या केली.  माहितीनुसार, ३  नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:१३  वाजता गांधी नगर परिसरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती मिळाली. सुफियान असे मृताचे नाव असून तो ई-रिक्षा चालवत होता आणि तो गांधी नगर येथील सोनिया गांधी कॅम्प झोपडपट्टीत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर हा गुन्हा करणाऱ्या दोन मुलांची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा