सरकारी नोकरीच्या नावे १०.३५ लाखांचा गंडा

संशयित दीपाश्री महतो सावंत गावस हिच्यावर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
सरकारी नोकरीच्या नावे १०.३५ लाखांचा गंडा

म्हापसा : लेखा संचालनालयात अकाऊंटन्टची नोकरी देण्याचे आमिष दाखवून नादोडातील एका युवकाला १०.३५ लाखांना गंडा घातला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित आरोपी दीपाश्री प्रशांत महतो उर्फ सावंत उर्फ गावस (रा. पणजी व मूळ नादोडा बार्देश) हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याच्या घोटाळ्यातील संशयित दीपाश्री या एक संशयित आरोपी असून तिच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अर्जुन वामन देसाई (वाडी नादोडा, बार्देश) यांनी पोलिसांत तक्रार गुदरली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध हा गुन्हा नोंदवला आहे. हा फसवणुकीचा प्रकार गेल्या २०१८ मध्ये घडला.
संशयित महिलेने फिर्यादी युवकाला लेखा संचालनालयात अकाऊंटन्टची सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. या नोकरीसाठी संशयित महिलेने फिर्यादींकडून १० लाख ३५ हजार रुपये रक्कम घेतली. पण बुधवारपर्यंत संशयित महिलेने नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर करीत आहेत.