मायभूमीत परतत पॉलिहाऊस सर्व्हिस प्रोव्हायडरचा प्रवास युवकांना आदर्शवत
मडगाव : मुंबईतील झगमगाटाची फिल्म इंडस्ट्री सोडून मायभूमीच्या ओढीने मूळ काणकोणमधील रोहित भट गोव्यात आले. पुण्यातील कन्सल्टंसीसोबत काम करतानाच १० वर्षांनी आता गोव्यातील एकमेव अधिकृत पॉलिहाऊस विक्रेते म्हणून कार्य करत आहेत. पॉलिहाऊस हा कमी जागेत मानसिक स्वास्थ्यासह आर्थिक सबळ करणारा व्यवसाय असून युवकांनी पुढे यावे, असेही ते अनुभवावरुन सांगतात.
राज्य सरकार कृषी विभागामार्फत विविध योजना व लाभ देत कृषी क्षेत्र वाढवण्यासाठी कार्यरत असतानाच कृषी क्षेत्रात करिअरची वेगळी पायवाट धुंडाळत रोहित भट यांनी यश प्राप्त केले. मूळ काणकोण येथील रोहित भट यांना सिनेमाचे फार वेड होते. फिल्म इंडस्ट्रीत काहीतरी करायचे या हेतूने मुंबई गाठली. फिल्म अॅंड टेलिव्हिजनच्या क्षेत्रात मुंबई व पुण्यातही काम केले. या झगमगाटाचा कंटाळा आल्यानंतर रोहित यांना गोव्याच्या मूळ भूमीची आठवण येऊ लागली. त्यांनी गोव्यात येत काहीतरी करण्याचा निश्चय करुन ते २००३ साली गोव्यात आले. गोव्यात आल्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रात कार्यरत पुणे येथील साने यांच्या कन्सल्टंसीसोबत काम करण्यास सुरुवात केली. मागील दहा ते अकरा वर्षे त्यांनी पॉलिहाऊस उभारणी, ग्रीन हाऊसमधील झाडांबाबतची माहिती, त्यांची निगा कशी राखावी, उत्पादन कसे वाढवावे व मार्केटमधून फायदा कसा घ्यावा याबाबत कामातील बारकावे समजून अनुभव घेतला. आता राज्यात पॉलिहाऊस उभारणी करुन फूल उत्पादन व्यवसायाची सुरुवात करुन देण्याच्या कामांना सुरवात केली आहे. आतापर्यंत राज्यात ५४ पेक्षा जास्त पॉलिहाऊसची उभारणी भट यांनी केली आहे.
राज्यातील किनारी भागापासून सुमारे १५ किमीच्या अंतरात आर्द्रता जास्त असते. ऑर्चिड व इतर ग्रीन हाऊस फुलांच्या वाढीसाठी हे पोषक वातावरण असते. त्यामुळेच पुणेसारख्या शहरात गुलाब व इतर फुले होतात पण ऑर्चिड मोठ्याप्रमाणात होत नाहीत. केरळमध्ये किनारी भागात ३०० पेक्षा जास्त पॉलिहाऊस आहेत. गोव्यातही पॉलिहाऊसमधील फुलांना चांगली मागणी आहे. पॉलिहाऊसमधील ऑर्चिड व इतर फुलांना राज्यासह परदेशातही मोठी मागणी आहे. राज्यात धार्मिक कार्यांसाठीही ताज्या फुलांची मागणी होते. मोपा विमानतळामुळे आता फुलांची निर्यात सोपी झालेली आहे. युवावर्गाने या व्यवसायात येण्याची गरज आहे, असे मत रोहित भट यांनी व्यक्त केले.
राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त पॉलिहाऊस विक्रेता
राज्यात यापूर्वी पॉलिहाऊस निर्मिती व फूल उत्पादन व्यवसाय उभारणी क्षेत्रात राज्याबाहेरील कन्सल्टंसींचा वावर होता. पण पॉलिहाऊस उभारणीनंतर एखाद्यावेळेला अडचणी आल्यास सर्व्हिस मिळत नव्हती. याचमुळे राज्यातील कन्सल्टंसी म्हणून गोवा कृषी विभागाकडून भट यांनाच मान्यता देण्यात आली. चांगली सेवा देण्यासाठी रोहित भट नेहमीच कार्यरत असतात.
पॉलिहाऊसमध्ये फुलांचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास कमी जागेत जास्त फुलांचे उत्पादन घेता येते. विरंगुळा म्हणूनही फुलांच्या सानिध्यात राहताना आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा पॉलिहाऊस हा चांगला मार्ग आहे. सरकारच्या योजनांचा फायदा या व्यवसायासाठी होत आहे. मार्केटसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यासाठी युवकांना सदैव सहकार्य असेल, असे रोहित भट यांनी सांगितले.