फोंडा : सरकारी नोकरीसाठी रक्कम घेतल्याचा ऑडिओ प्रकरणी सुदीप ताम्हणकर यांनी बुधवारी सकाळी आमदार गणेश गावकर यांच्या विरोधात कुळे पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली आहे. सरकारी नोकरी फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून आमदार विरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन ताम्हणकर यांनी केले आहे.
सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचा २०२२ सालीच्या विधानसभा निवडणुकीनंतर व्हायरल झालेला ऑडिओ अचानक मंगळवारी पुन्हा व्हायरल झाला. या ऑडिओमध्ये आमदार गावकर यांनी एका युवकांशी फोनवर केलेली चर्चा वादाच्या भोवाऱ्यात सापडली आहे. सरकारी नोकरीसाठी आमदार एका युवकाकडे उर्वरित ६ लाख रुपये देण्याची मागणी करीत असल्याचे ताम्हणकर यांनी म्हटले आहे.
पत्रकारांना अधिक माहिती देताना ताम्हणकर यांनी आमदार गणेश गावकर यांचा ऑडिओ व्हायरल झाला असून यात रक्कम घेऊन सरकारी नोकरी दिल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारी नोकरीसाठी रक्कम देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. भाजप सरकार २०१२ साली सत्तेवर आल्यानंतर सरकारी नोकरी विक्री सुरु झाली होती. त्याचा परिणाम सध्या राज्यभरात दिसून येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सरकारी नोकरी विक्री संबंधित तक्रारी झालेल्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन गोमंतकीय जनतेला दिले होते. त्यामुळे आमदार गणेश गावकर यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे असल्याचे सांगितले.
पूजा नाईकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
म्हार्दोळ पोलिसांनी श्रीधर सतरकर (केरी-फोंडा) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पूजा नाईक यांचा ३ दिवसांचा रिमांड संपुष्टात आल्याने बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने पूजा नाईक याना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.