अमेरिका : ट्रम्प यांनी मस्क-रामास्वामीवर सोपवली सरकारचा वायफळ खर्च रोखण्याची जबाबदारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th November, 10:59 am
अमेरिका : ट्रम्प यांनी  मस्क-रामास्वामीवर सोपवली सरकारचा वायफळ खर्च रोखण्याची जबाबदारी

वॉशिंग्टन : टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योजक-राजकारणी विवेक रामास्वामी यांच्यावर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. मस्क आणि रामास्वामीवर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DOGE) चे नेतृत्व करतील, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की इलॉन मस्क आणि रामास्वामी येत्या काळात त्याच्या  प्रशासनासाठी सरकारी नोकरशाहीची मरगळ दूर करण्याचा, अतिरिक्त नियम कमी करण्यासाठी, व्यर्थ खर्चात कपात करण्यासाठी आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करण्यासाठी सुटसुटीत आराखडे तयार करत त्यावर काम करतील. निवडणुकीपूर्वी देखील मस्क यांनी त्यांच्याकडे सरकारी कामकाजात निर्माण झालेली मरगळ दूर करण्यासाठी ब्ल्यूप्रिंट असल्याचे म्हटले होते. त्यांचे निवडणुकतील काम आणि आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात असलेली कीर्ती पाहता ट्रम्प यांनी मस्क यांना ही जबाबदारी दिली आहे. या एजन्सीद्वारे सरकारच्या कामकाज आणि इतर गोष्टींचे ऑडिट केले जाईल तसेच यातील समितीद्वारे विविध सुधारणा देखील सुचवल्या जातील  

गेल्या महिन्यात पत्रकारांशी संवाद साधताना मस्क यांनी सरकारी खर्च २ ट्रिलियन डॉलरने कमी करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे म्हटले होते. व्यावहारिक विचार करता, सरकारच्या कामकाजात नियमन आणि धोरणात्मक बदल केल्यास मस्क यांच्या टेस्ला, स्पेसएक्स, एक्स आणि न्यूरालिंक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांना देखील बराच फायदा होईल. बायडेन यांच्या सरकारमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची गळचेपी झाल्याचे अनेक तंत्रज्ञानविषयक उद्योजकांनी बऱ्याचदा म्हटले होते.   

रामास्वामी हे बायोटेक उद्योजक आहेत. रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांना उमेदवारी देण्यापूर्वी रामास्वामी यांना उमेदवारी देण्याबाबत विचार केला होता. दरम्यान रामास्वामी हे रिपब्लिकन विचारसणीचे खंदे समर्थक असून, आगामी सरकारमध्ये धोरणात्मकरीत्या काम करण्यास आवडेल असे त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर अनेकदा म्हटले आहे. जरी रामास्वामी यांना सरकारी कामकाजाचा अनुभव नसला तरी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील वायफळ खर्च कमी करण्यासाठी अनेक धोरणे बनवली आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या कंपनीत चांगल्यारीतीने अवलंब देखील केला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी  डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा ६९  इलेक्टोरल मतांनी पराभव केला. आपल्या विजयी भाषणादरम्यान, ट्रम्प यांनी मस्कचे कौतुक केले होते आणि त्यांचे  एक अद्भुत आणि उत्कृष्ट प्रतिभावान व्यक्ती म्हणून वर्णन केले होते. ट्रम्प यांच्या विजयात मस्क यांच्या धोरणात्मक ब्ल्यूप्रिंटचे महत्वाचे योगदान आहे. दरम्यान मस्क आणि रामास्वामी ४ जुलै २०२५ पर्यंत आपल्या आराखड्यानुसार कामकाज सुरू करतील अशी प्राथमिक माहिती आहे.  त्यांचे सर्वात मोठे प्राधान्य प्रशासनाचा होणारा वायफळ खर्च वाचवणे हेच असणार आहे.  २०२५ साली अमेरिका आपल्या स्वातंत्र्याची २५० वर्षे साजरी करणार आहे.    

हेही वाचा