फोंडा : फर्मागुडी आयआयटी कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या पत्राने खळबळ; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तत्काळ कॅम्पस खाली केला. तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th November 2024, 11:57 am
फोंडा :  फर्मागुडी आयआयटी कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या पत्राने खळबळ; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

फोंडा: आज सकाळी फर्मागुडी येथील आयआयटी कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याचे पत्र पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत खबरदारीचा उपाय म्हणून येथील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढत कॅम्पस खाली केला. 



कॅम्पसमध्ये असलेल्या सर्व ६०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच या ठिकाणी फोंडा पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोन वाजल्यापासून परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घटनास्थळी  अग्निशमन दलाचे कर्मचारी व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. गोव्याच्या विमानतळांना लक्ष्य करत बॉम्बच्या धमक्या दिल्यानंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेला देण्यात आलेली ही पहिलीच धमकी आहे. सद्यघडीस फर्मागुडी येथे उपजिल्हाधिकारी शुभंम नाईक, उपअधीक्षक शिवराम वायगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर व अन्य अधिकारी दाखल झालेत,



 

दरम्यान देशात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने कॉल्स आणि मेसेजच्या माध्यमातून रेल्वे, विद्यालये, विमाने-विमानतळे, मंदिरांना बॉम्बने उडविण्याच्या तसेच अनेक सेलेब्रिटींना लक्ष्य करत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील विविध यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. आयआयटी कॅम्पसमधील घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून कुणा विद्यार्थ्याने आगळिक तर केली नाही ना ? या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. सध्या पोलीस त्यांना मिळालेल्या निनावी पत्राचे स्त्रोत तपासण्यात  गुंतले आहेत. दरम्यान याठिकाणी बॉम्ब निकामी करण्यासाठी विशेष पथक हजर झाले आहे.




बातमी अपडेट होत आहे.  


हेही वाचा