बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

युवा वर्गाकडून उकळले लाखो रुपये : गुन्हा शाखेकडून ५ जणांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

म्हापसा : बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन युवा वर्गाकडून लाखो रुपये घेणार्‍या रॅकेटचा गुन्हा शाखेने पदार्फाश केला. या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात हे बनावट प्रमाणपत्राचा वापर करून सरकारी नोकरी मिळवलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे.
वायलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशन या बोगस संस्थेतर्फे ही बनावट प्रमाणपत्रे दिली जात होती. ही संस्था चालवणार्‍या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. या बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी सरकारी, तसेच खासगी आस्थापनांमध्ये नोकरी मिळवली असल्याचा प्रकारही या टोळीकडून उघडकीस आला आहे.
बिंदी रामकृष्ण परब (३४, गावंडळी, कुंभारजुवे), भावेश बालकृष्ण हळदणकर (३३, रा. सडेतीवाडा चोडण), निरज गोविंद गावडे (३१, रा. गावकरवाडा पिळगाव), विष्णूदास देमू भोमकर (४२, रा. खंडीवाडा करमळी) व यशवंत रामा खोलकर (३७, रा. तांबडीमाती, ताळगाव) या संशयितांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
शैक्षणिक पात्रतेबद्दल दिशाभूल करण्यासाठी बनावट मार्कशीट आणि विविध संस्थांची बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचा बिंदी परब हिच्यावर संशय आहे. तिने १५ ते २० अशी बनावट प्रमाणपत्रे युवकांना दिली आहेत. तर संशयित आरोपी भावेश हळदणकर हा वायलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्यूकेशन या संस्थेचा एजंट म्हणून काम करत होता. तसेच संशयित विष्णूदास भोमकर याने बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी, तर इतरांनी खासगी नोकरी मिळवली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भा.न्या.सं.च्या ३३६(३), ३(५)(६) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास देयकर, निनाद देऊलकर, दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बोगस संस्था चालकाचा शोध सुरू
- संशयित शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० व १२ साठी २५ ते ३५ हजार रुपये आणि पदवी अभ्यासक्रमासाठी ५५ हजार ते १.३५ लाख रुपये शुल्क आकारत होते.
- नंतर संबंधितांना उत्तीर्ण म्हणून बनावट प्रमाणपत्र दिले जायचे. ही शुल्काची रक्कम गुगल पे व रोकडद्वारे घेतली जात होती.
- या टोळीतील इतर संशयितांसह वायलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशन संस्थेच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी आवळल्या संशयितांच्या मुसक्या
पणजी येथे वायलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशनचे कार्यालय २०२० साली सुरू करण्यात आले. या कार्यालयामार्फत विविध शैक्षणिक संस्थांच्या नावे बोगस प्रमाणपत्रे दिली जात होती. हा प्रकार गुन्हा शाखेच्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर मंगळवारी (दि. १२ रोजी) विविध ठिकाणी छापा टाकून सर्व संशयितांना पकडून अटक करण्यात आली.