पाटो येथे छापा : पर्वरीतील घराचीही झाडाझडती
म्हापसा : एका कंपनीचे बिल प्रलंबित ठेवून लाच घेताना अतुल वाणी याला सीबीआयच्या गोवा विभागाने रंगेहाथ पकडले. संशयिताचे कार्यालय आणि पर्वरीतील घरावरही रात्री उशिरापर्यंत छापा टाकून त्याची चौकशी सुरू होती.
सीबीआयने ही कारवाई गुरुवारी दुपारी पाटो-पणजी येथील सेंट्रल लायब्ररीजवळ केली. सुरक्षारक्षक आणि हाऊसकिपिंग सेवा पुरवणाऱ्या राज इंटरप्राईजेस नामक एका कंपनीचे सहा महिन्यांचे बिल प्रलंबित होते. आयकर खात्याच्या पणजीतील आयकर भवनमध्ये लेखा विभागाशी संबधित दस्तावेज हाताळणाऱ्या मात्र आयकर खात्याचा कर्मचारी नसलेल्या अतुल वाणी याने हे बिल देण्यासाठी या कंपनीकडे लाच मागितली. कंपनीने लाचेची रक्कम देऊ केली. तसेच याबाबतची तक्रार बुधवार दि. १३ रोजी सीबीआयकडे केली होती.
देवाणघेवाणीचा व्यवहार पाटो येथील सेंट्रल लायब्ररीजवळील पार्किंगस्थळी करण्याचे ठरले. अतुल वाणी हा कारमध्ये बसून लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच तिथे सीबीआयच्या गोवा विभागाने छापा टाकला व त्याला रंगेहाथ पकडले.
लाचेची रक्कम तसेच संशयिताची कार जप्त केल्यानंतर आयकर भवनातील संशयिताच्या कार्यालयाची सीबीआयच्या पथकाने झाडाझडती घेतली. शिवाय संशयिताच्या पर्वरीतील घरावरही छापा टाकण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हा छापा सुरू होता.
सीबीआयचे गोवा विभागचे अतिरिक्त अधीक्षक टी. संतोषकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अर्जुन कुमार मौर्य यांच्या नेतृत्वाखाली अपर्णा चोपडेकर, स्नेहा सहानी व इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
लाचेची रक्कम सीबीआय पथकाच्या हाती
सीबीआयचा छापा पडताच संशयित अतुल वाणी यांनी कारमधून उडी टाकत पळ काढला. सीबीआय पथकाने ५० ते १०० मीटर धाव घेत संशयिताला पकडले. कारच्या डॅश बोर्डमध्ये लपवलेली लाचेची रक्कम सीबीआय पथकाच्या हाती लागली. नंतर ही रोकड जप्त करण्यात आली.