देशात घटत चालली फॅमिली डॉक्टरांची संख्या

आपल्या देशातही वैद्यकीय क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल, नवे अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, नवे शोध, संशोधन, स्पेशलिटी डॉक्टरांच्या संख्येत वाढ अशा कारणांमुळे अनेक भागांत फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नावालाही शिल्लक राहिली नाही.

Story: विचारचक्र |
14th November, 12:27 am
देशात घटत चालली फॅमिली डॉक्टरांची संख्या

विसावे शतक संपत असताना, भूतकाळावर नजर टाकल्यावर असे लक्षात आले की, जगात अनेक क्रांतिकारक आणि विलक्षण वाटावेत असे बदल प्रत्येक क्षेत्रात घडले. मानवी कल्याणासाठी जसे ते उपकारक मानले गेले, तसे काही बदल हे मानवी हिताच्या विरुद्ध होते. गेली काही शतके गावागावांत वैद्य अथवा डॉक्टर रहिवाशांवर उपचार करीत असत. गावातील डॉक्टर म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा आधार. वैद्यकीय क्षेत्राचा प्रचंड कायापालट झाला, नवनवे शोध लागले, उपचार पद्धती बदलली, नवी परिणामकारक औषधे आली. असे असले तरी गावातील ‘फॅमिली डॉक्टर’ मात्र कायम सेवा देत राहिले, उपचार करीत राहिले. ही स्थिती २००० सालानंतर बदलली. नव्या शतकाच्या प्रारंभीच असे लक्षात आले की, जगातील अनेक भागांत फॅमिली डॉक्टर आता राहिलेले नाहीत. कुटुंबातील प्रत्येक माणसाची माहिती असलेला, बालपणापासून उपचार करणारा डॉक्टर काळाच्या पडद्याआड तर चालला नाही ना, अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या देशातही वैद्यकीय क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल, नवे अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, नवे शोध, संशोधनाची सातत्यपूर्ण प्रक्रिया, स्पेशलिटी डॉक्टरांच्या संख्येत वाढ अशा कारणांमुळे अनेक भागांत फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच नावालाही शिल्लक राहिली नाही. एकतर सरकारी दवाखान्यात चला, आरोग्य केंद्रात जा किंवा जिल्हा पातळीवरील सरकारी अथवा खासगी इस्पितळात धाव घ्या, असे मोठे बदल भारतीयांच्या जीवनात दिसू लागले. या सर्व त्सुनामीत गावातील डॉक्टर कधी गायब झाले, हेही लक्षात आले नाही. याचाच परिणाम म्हणून २००२ साली भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर करताना, आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ विकासाचा केंद्रबिंदू म्हणून फॅमिली मेडिसिन घोषित केले. तेव्हापासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधील तज्ज्ञ पदांवर डीएनबी फॅमिली मेडिसिन पात्रता असलेल्या बहुकुशल डॉक्टरांना नियुक्त करण्याची चर्चा सुरू झाली. याचाच भाग म्हणून कौटुंबिक डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याच्या विचारांना चालना द्यावी, असे सरकारला अलीकडे वाटू लागले आहे.

फॅमिली डॉक्टर अर्थात कौटुंबिक डॉक्टर घडविण्यासाठी खास अभ्यासक्रम तयार केला जात असल्याचे सूतोवाच गोवा वैद्यकीय महाविद्यालय तथा इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी नुकतेच केले आहे. फॅमिली डॉक्टरकडे धाव घेऊन, घसा दुखणे, सर्दी-ताप यावर उपचार घेणारे रुग्ण आता थेट इस्पितळात धाव घेतात हे जसे एक कारण आहे, तसेच वैद्यकीय पदवी प्राप्त केलेला डॉक्टर तेथेच न थांबता पदव्युत्तर शिक्षण घेत एमडी मिळवतो आणि एखाद्या वैद्यकीय शाखेत प्राविण्य मिळवित स्पेशलिस्ट बनतो. तसाच बहुतेकांचा कल असल्याने एमबीबीएस पदवी घेऊन शहरात किंवा गावात औषधोपचार करणारे डॉक्टर कमी होत चालले आहेत, हे यामागचे दुसरे कारण असावे. यासाठीच गोव्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन फॅमिली मेडिसिनमधील एमडी घेतलेले डॉक्टर तयार करावेत असा विचार पुढे आलेला आहे, असे दिसते. गोमंतकीयांना आजारपणात गावातील डॉक्टरांकडे जाण्याची सवय झालेली असते. काही वेळा डॉक्टर घरी येऊन (व्हिजिट) तपासणी करतात. बहुतेक वेळा रुग्णाला या उपचाराने गुण पडतो, कारण त्याची पार्श्वभूमी संबंधित डॉक्टरांना ठाऊक असते. अगदी क्वचितच डॉक्टर दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायचा सल्ला देत असतात. तेथे गेल्यावर मग विविध चाचण्या सुरू होतात आणि रुग्णाला भूर्दंड पडतो. काही वेळा अशा चाचण्या आवश्यक असतात हे मान्य केले तरी खासगी इस्पितळे भरमसाठ शुल्क आकारतात, असे अलीकडे दिसून येऊ लागले आहे. ही सारी परिस्थिती पाहता, कौटुंबिक डॉक्टर ही संकल्पना चांगली असून, तिचा प्रसार व्हायला हवा. मेडिसिनमधील एमडी हाही विशेष तज्ज्ञ असल्याने तोही जादा शुल्क आकारेल, ही शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सामान्य रुग्णाला त्याचा खरोखरच उपयोग होईल का, त्याचा आधार वाटेल का, आर्थिकदृष्ट्या परवडेल का, अशा काही शंका निर्माण होतात. रक्तदाबासारख्या समस्येवर उपाय करताना खुद्द असे डॉक्टर तपासणी करतील, जी इतरत्र परिचारिकेला सोपवली जाते. संख्या वाढली तर तेवढा वेळ असे कौटुंबिक डॉक्टर देऊ शकतील.

फॅमिली मेडिसिन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात संशोधन कार्य करण्यास मदत करेल आणि या क्षेत्रात फिजिशियन म्हणून करिअर विकसित करू शकेल. हा अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे ज्यांना गरजू लोकांना मदत करायची आहे आणि गुंतागुंतीच्या आजारांचे व्यवस्थापन करायचे आहे. ‘नॅशनल मेडिकल कमिशन अॅक्ट-२०१९’ने विशेषत: यूजी आणि पीजी बोर्डांना फॅमिली मेडिसिन स्पेशालिटी मजबूत करणे बंधनकारक केले आहे. सर्व नवीन ‘एम्स’मध्ये फॅमिली मेडिसिनमध्ये एमडी अभ्यासक्रम सुरू केला जात आहे.

गोव्यात अनेक भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तेथे चांगले उपचार होताना दिसतात. गावातील आजारी व्यक्ती अशा वैद्यकीय सुविधांचा लाभ घेताना दिसते. काही उपकेंद्रेही कार्यरत आहेत. संख्या घटत चाललेल्या खासगी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी रहिवासी केंद्रात जायला प्राधान्य देतात. राज्याच्या दृष्टीने ही बाब प्रशंसनीय आहे. जेथे फॅमिली डॉक्टर उपलब्ध नाहीत, तेथील लोकांचा कल आरोग्य केंद्रात जाण्याकडे असतो, असे चित्र राज्यात दिसते. अधिक उपचाराची गरज भासल्यास संबंधित डॉक्टर मोठ्या सरकारी इस्पितळात रुग्णाला पाठविण्याचा निर्णय घेत असतात. त्यामुळे सामान्य माणसाला निश्चितपणे दिलासा प्राप्त होत असतो. अशा आरोग्य केंद्रात भविष्यात तयार होणारे वर उल्लेखित फॅमिली मेडिसिनमधील डॉक्टर नियुक्त केले गेल्यास जनतेला मोठा आधार लाभू शकेल.


गंगाराम केशव म्हांबरे, (लेखक पत्रकार असून विविध विषयांवर लेखन करतात) मो. ८३९०९१७०४४