सोने पोलिसांनी हस्तगत करू नये यासाठी प्रयत्न : राजकीय व्यक्तीचीही घेतली मदत
म्हापसा : पर्वरी पोलिसांनी मास्कधारी टोळीकडून अर्धा किलो सोने हस्तगत केले आहे. मात्र त्यानंतर इतर चोर्यांच्या प्रकरणातील चोरीला गेलेले दागिने अद्याप पोलिसांना हस्तगत करता आलेले नाहीत. मात्र हे सोने पोलिसांनी हस्तगत करू नये यासाठी मडगावातील एका माजी नगरसेवकाने पोलिसांवर दबावतंत्र चालवले आहे.
पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी मारिआ उर्फ मारियो बाप्तिस्ता उर्फ सांताना (४४, रा. ग्रॅण्ड पेडे, बाणावली) व साथीदार संशयित मोहम्मद शेखमिया सुफियान (२०, रा. कालकोंडा-मडगाव) या मास्कधारी टोळीने चार तालुक्यांतील ७० पेक्षा जास्त घरे फोडली आहेत. यातील फक्त २२ गुन्हे पर्वरी, पणजी, म्हापसा, हणजूण, जुने गोवे, आगशी, फोंडा व वेर्णा या पोलीस स्थानकांत नोंद आहेत. इतर लोकांनी पुढे येऊन अद्याप पोलिसांत तक्रार नोंदवलेली नाही.
जुने गोवे पोलिसांना संशयितांना मेरशी येथील नसरीन शेख यांचे घरफोडीप्रकरणी अटक केली. मात्र या चोरीतील ३० लाखांचे सुवर्णलंकार जप्त करणे शक्य झालेले नाही. आता हणजूण पोलिसांनी मार्ना शिवोली व आसगाव येथे झालेल्या दोन चोरीच्या प्रकरणात संशयितांना अटक केली आहे.
या दोन्ही चोरींमध्ये सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. हे चोरीचे दागिने हस्तगत होऊ नये म्हणून मडगावातील एका माजी नगरसेवकाने जुने गोवे पोलिसांप्रमाणेच हणजूण पोलिसांवरही दबावतंत्र चालवले आहे. संशयितांना ज्या पोलीस स्थानकात अटक केले जात आहे तेथे हा माजी नगरसेवक ठाण मांडतो व तिथून आपल्या एका राजकीय व्यक्तीच्या आधारे पोलिसांवर दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे.
गावसावाडा सडये येथे २० सप्टेंबर २०२४ रोजी एका व्हिलामध्ये चोरी झाली होती. यातून सुवर्ण व हिर्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. फिर्यादी सुप्रीत भम्राह (रा. मूळ उत्तर प्रदेश) यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या चोरीमध्ये संशयित मारियो बाप्तिस्ता व मोहम्मद सुफीयान या दोघांना पोलिसांनी हस्तांतरीत पद्धतीने अटक केली होती. त्यानंतर आता संशयितांना हणजूण पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर राजकारण्याच्या दबावामुळे अजून या टोळीकडून दागिने हस्तगत होण्याची शक्यता कमी असून आता फक्त संशयितांना औपचारिकता म्हणून इतर पोलीस स्थानकांत अटक होणार आहे.