पेडणेः स्थानिकांच्या व्यवसायावर विदेशी पर्यटकांचा डोळा

दुचाकी भाड्याने देणारे रशियन भाषेतील स्टिकर्स हरमलमध्ये झळकले

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
11th November, 11:56 pm
पेडणेः  स्थानिकांच्या व्यवसायावर विदेशी पर्यटकांचा डोळा

हरमलः येथील किनारी भागांत पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला असला तरी परप्रांतीय व्यावसायिक स्थानिकांच्या व्यवसायाआड येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात हरयाणा नोंदणीकृत चारचाकी वाहनातून भाडे मारणाऱ्या पर्यटकांची गाडी, स्थानिक व्यावसायिकांनी अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. 

याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी ११ च्या सुमारास एक विदेशी पर्यटक किनारी पट्ट्यात पर्यटक दुचाकी, चारचाकी गाड्या भाड्याने देणे तसेच गोवा दर्शन घडविणे याबाबतचे स्टिकर्स चिकटवत असताना रंगेहात सापडला आहे. स्टिकर्स चिकटवत असताना स्थानिक व्यावसायिक फ्रान्सिस डिसोझा व अन्य युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

सदर विदेशी पर्यटक दुचाकी,चारचाकी गाड्या भाड्याने देणे तसेच गोवा दर्शन घडविणे याबाबतीत स्टिकर्स चिकटवत होते. त्या स्टिकर्समुळे इथला स्थानिक व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने फ्रान्सिस यांनी संताप व्यक्त केला. 

प्रत्येक वीज खांबावर अनेक पोस्टर्स, स्टिकर्स लावले असून वीज खात्याची परवानगी घेतली आहे का,ह्याचा खुलासा करण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत. रशियन भाषेत लावले जाणारे पोस्टर्स नेमके कसले आहेत, हे कळणे मुश्कील होत असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. त्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व व्यावसायिकांनी केली आहे.