गोवा हाऊसिंग बोर्डचा व्यक्ती असल्याचे सांगत फसवणूक
म्हापसा : गोवा हाऊसिंग बोर्डचा अधिकृत व्यक्ती असल्याचे सांगून गृहमंडळाचा भूखंड तसेच लेखा खात्यात सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून नेवरा पिलार येथील एका महिलेला ५.५० लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मोहम्मद सादिक शेख (रा. भाटले पणजी) याच्याविरुद्ध पणजी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संशयिताने फिर्यादीला बनावट भूखंड वाटपाची पावती आणि नोकरीचे नियुक्तीपत्रही दिले होते.
फसवणुकीचा प्रकार जुलै २०२१ पूर्वी ताळगाव येथे घडला. याप्रकरणी फिर्यादी नसरीन बानू शेख मझरली यांनी पणजी पोलिसांत मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. संशयित मोहम्मद शेख याने नसरीन यांना आपण गोवा हाऊसिंग बोर्डचा अधिकृत व्यक्ती असल्याचे सांगितले. पर्वरी येथील सर्व्हे क्र. ८४, ८५, ८६, ८८, ८९ मध्ये भूखंड वाटप करीत असल्याचे सांगून ३.३० लाख रुपये तिच्याकडून घेतले. भूखंड वाटपची पावतीही तिला दिली. तसेच लेखा संचालनालयात कारकुनाची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. नोकरीसाठी फिर्यादीकडून २.२० लाख रुपये रक्कम घेत नोकरीचे नियुक्तीपत्रही दिले.
काही कालावधीनंतर संशयिताने देलेले भूखंड वाटप पत्र आणि नोकरीचे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे तिला समजले. संशयिताने तिला ५ लाख ५० हजारांचा गंडा घातला होता.
तक्रार दाखल झाल्यावर पणजी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला अाहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.