तिस्क उसगांव येथे वडिलांचा खून करून मुलाची आत्महत्या

कोयत्याने वार करून खून केल्याचे तपासात उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November, 12:34 am
तिस्क उसगांव येथे वडिलांचा खून करून मुलाची आत्महत्या

फोंडाः अवंतीनगर -उसगाव येथे वडील बळीराम चंदीगडकर (७०) याचा कोयत्याने खून करून प्रमोद चंदीगडकर (४०) या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रमोद चंदीगडकर यांची गेल्या काही दिवसापासून मानसिक स्थिती ठीक नव्हती. घटनास्थळाच्या एकंदरीत परिस्थितीवरून बळीराम चंदीगडकर यांचा खून मंगळवारी रात्री केल्याचा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

तिस्क - उसगाव बाजारात हमाली करणाऱ्या बळीराम चंदीगडकर यांचा राहत्या घरात कोयत्याने वार करून खून करण्यात आला. डोक्यावर, गळ्यावर व अन्य भागात कोयत्याने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रमोद चंदीगडकर याने गळफास लावून आत्महत्या केली. 

बुधवारी दुपारी फोंडा येथे राहणारी बळीराम चंदीगडकर यांची मुलगी घरी आल्यानंतर प्रकार उघडकीस आला. फोंडा पोलिसांना या घटनेची त्वरित माहिती देण्यात आली. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री प्रमोद चंदीगडकर हा तिस्क -उसगाव बाजारात फिरत असल्याचे अनेक जणांनी पाहिले होते. तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य व भाज्या त्याने मंगळवारी रात्री खरेदी केले होते. वडील व मुलगा दोघेही मित्रा प्रमाणे घरात नांदत होते. पण मंगळवारी रात्री वडिलांचा खून करण्याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

बळीराम चंदीगडकर यांचे दुर्दैवः
बुधवारी मृत अवस्थेत आढळून आलेल्या बळीराम चंदीगडकर याच्या पत्नीचा कोविड काळात मृत्यू झाला होता. अंदाजे १०-१२ वर्षापूर्वी त्याच्या जावयाचा खून सुद्धा उसगाव भागात करण्यात आला होता. त्यामुळे विधवा झालेली मुलगी सध्या फोंडा परिसरात राहत होती. तसेच काही वर्षांपूर्वी थोरल्या मुलाचे लग्न झाल्यावर अवघ्या सहा महिन्यात मुलाचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर सून आपल्या माहेरी गेली होती. 

हेही वाचा