वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्या ७८ संकेतस्थळांना आतापर्यंत ब्लॉक करण्यात गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेला यश आले आहे.
म्हापसा : गेल्या काही वर्षांत गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला येथे चालणाऱ्या काही चुकीच्या कृत्यांमुळे गालबोट लागले आहे. कित्येकदा तर पर्यटक 'रम-रमा-रमी' साठीच गोव्यात यायचे प्लान आखतात. गोव्यात आल्यावर हे बऱ्याचदा पर्यटक आक्रस्ताळेपणाने वागतात. अशाच पर्यटकांच्या शोधात असलेल्या दलालांचे मग चांगलेच फावते. पर्यटकांना डान्सबार, मुली आणि ड्रग्स तसेच दारूचे आमिष दाखवत चांगलेच लुबाडले जाते. पण यामुळे गोव्याची नाहक बदनामी होते. दरम्यान एस्कॉर्ट वेबसाईटद्वारे गोव्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोघा दलालांना गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने आंध्र प्रदेशमधून अटक केली आहे.
एस्कॉर्ट वेबसाईटद्वारे वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी, गुन्हा शाखेने आरोपी सय्यद सुलतान उस्मान (५४, रा. चित्तोर आंध्रप्रदेश) मोहम्मद सलामतुल्लाह मोहेबुल्ला (३०, रा. गुरगाव हरियाणा) यांना अटक केली. हे दोघेच सदर वेबसाईट हाताळणे व दलालीची कामे करतात. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखा व सायबर गुन्हे विभागाने आतापर्यंत ७८ संकेतस्थळे ब्लॉक केली आहेत. त्याचप्रमाणे ही संकेतस्थळे चालवणाऱ्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांतर्फे सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २५ ऑक्टोबर रोजी संशयितांविरुद्ध पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७,६७ अ, महिला अश्लिल प्रतिनिधीत्व कायदा कलम ६ व वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी तपासणी करत असताना गुन्हे शाखेला सदर संकेतस्थळ आंध्र प्रदेशमधील मदनापल्ले येथून नियंत्रित करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार,गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने येथील पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली.
या दोघांनी सेफवॉक गोवा डॉट कॉम नावाची एस्कॉर्ट वेबसाईट तयार केली होती. यावर एका महिलेचा अश्लील फोटो वापरुन तेथे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्राहकांना ते करत होते. ग्राहकांनी या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर हे दोघे आपल्या एजंट्सना त्याची माहिती देत असत.
व्यवहार सुरळीत पार पडल्यानंतर संशयित ग्राहकांकडून रोख रक्कम किंवा डिजिटल पेमेंटतर्फे आपले कमिशन मिळवत. दरम्यान संशयित आरोपी अशाचप्रकारे एस्कॉर्ट संकेतस्थळ वापरून बंगळूरू, चेन्नई व देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे. या रॅकेटमध्ये गुंतलेल्या इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकाय देयकर, हवालदार उदेश केरकर, कॉन्सटेबल सुलेश नाईक व प्रकाश उत्कुरी या पथकाने ही कामगिरी केली.