डिचोली पोलिसांनी नोंदवला तिसरा गुन्हा
डिचोली : अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित आरोपी प्रिया यादवविरुद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दखल केला आहे. प्रिया यादवची घोटाळा मालिका वाढतच असल्याने डिचोली भागात खळबळ माजली आहे.
डिचोलीचे पोलीस उपधीक्षक जिवबा दळवी यांच्या माहितीनुसार, अशोक सोमनाथ पाणिग्रही (शांता कॉलनी, बोर्डे डिचोली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
२०१७ ते २०२३ दरम्यान डिचोली येथे प्रिया व अजय यादव (रा. कोल्हापूर)
जमिनीच्या मालमत्ता खरेदी करणे, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील दुकाने विकणे आणि रेल्वेत नोकरी देणे अशी खोटी आश्वासने देऊन तक्रारदाराला वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे अठरा लाख इतकी रक्कम घेऊन फसवणूक केली. तक्रारदाराच्या महिलेने फिर्यादीला बनावट वैद्यकीय खर्च सांगून सोन्याचे दागिने देण्यास प्रवृत्त केले.
या संदर्भात डिचोली पोलिसांनी भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी महिला दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असून तीन दिवस रिमांड घेतलेला आहे. आता नवीन गुन्हा दाखल झाल्याने डिचोली पोलीस पुन्हा कोठडी मागून घेणार आहेत.
आतापर्यंत दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणात प्रियाने अनेकांना कोटींची टोपी घातल्याचे उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक सोनाली हरमलकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.