पेडणेः क्रमांक नसलेल्या वाहनावर ट्राफिक पोलीसांकडून कारवाई कधी होणार?

किनारी भागांमध्ये बेकायदेशीर व्यवसायांचे प्रमाण वाढले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 12:03 am
पेडणेः  क्रमांक नसलेल्या वाहनावर ट्राफिक पोलीसांकडून कारवाई कधी होणार?

पेडणेः सध्या राज्यात पर्यटन हंगामाला सुरूवात झाली असून वाढते रस्ते अपघात आणि गैरव्यवसायाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे पर्यटनासाठी येणारे विदेशी पर्यटक गोव्यातील टॅक्सी व्यवसाय बेकायदेशीरित्या करत असल्याचे समोर आले असून काही विदेशी पर्यटक वाहनांना क्रमांक नसलेली वाहने सुसाट वेगाने फिरवत असल्याचे दिसून आले आहे. 

या प्रकारांकडे सरकार, वाहतूक खाते, ट्राफिक पोलीस लक्ष देऊन कारवाई कधी करणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

मांद्रे मतदार संघातील किनारी भागांमधून सध्या मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक बेकायदेशीर वाहनांचा व्यवसाय करत आहेत. पंधरा दिवसापूर्वी एक विदेशी पर्यटक खाजगी वाहन घेऊन भाडेपट्टीने काही पर्यटकांना घेऊन जात असल्याने स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र हे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत.

याही पुढे जाऊन आता काही देशी विदेशी पर्यटक ज्या वाहनांना क्रमांकच नाही अशी वाहने सुसाट वेगाने चालवताना दिसत आहेत. ही वाहने चोरीची नाही ना? तसेच या वाहनांमधून काही गैरव्यवहार सुरू नसेल ना असाही संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

 त्यामुळे रस्त्यावर फिरणारी क्रमांक नसलेल्या वाहनांवर ट्राफिक पोलीस आणि वाहतूक खात्याने तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी येथील स्थानिक करत आहेत.