तिसवाडी : गोव्याची स्वतंत्र अस्मिता राखण्यात पं. नेहरूंचे योगदान : काँग्रेस

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
14th November 2024, 02:43 pm
तिसवाडी : गोव्याची स्वतंत्र अस्मिता राखण्यात पं. नेहरूंचे योगदान : काँग्रेस

पणजी : भाजप नेत्यांनी कितीही खोटा प्रचार केला तरी गोव्याची स्वतंत्र अस्मिता राखण्यात पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान होते हे मान्य केले पाहिजे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले. पं.नेहरूंच्या १३५ व्या जयंती निमित्त काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लोस फेरेरा, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिना व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

मुक्ती नंतर गोव्याचे विलीनीकरण न करता तो एक केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. जनमत कौलाची कल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. एका अर्थाने त्यांनी गोव्यातील जनतेला निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांच्यामुळेच गोवा वेगळे राज्य म्हणून उदयास आले.  जनमत कौल झाला नसता तर गोवा आज महाराष्ट्रातील एक जिल्हा म्हणून राहिला असता.  गोवा आणि देशाप्रती पंडित नेहरूंचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही आलेमाव म्हणाले

पं. नेहरू हे एक दूरदर्शी नेते होते. स्वतंत्र झाल्यावर भारताची आर्थिक परिस्थितीत बिकट होती. अशावेळी नेहरूंनी भारताला उभारी देण्यासाठी विविध संस्था, प्रकल्प सुरू केले. त्यांनी आयआयटी, एम्स, डीआरडीओ, इस्रो अशा यांची स्थापन केली. आज मात्र केंद्रातील भाजप सरकार या संस्था विक्रीस काढत आहे. नेहरूंनी नेहमीच गोव्यातील जनतेच्या भावना ऐकल्या. आज राज्य सरकारने देखील जनतेच्या भावना काय आहेत हे समजून घ्याव्यात, असे अमित पाटकर म्हणाले

हेही वाचा