फोंडा : फर्मागुडी येथील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल सकाळी फोंडा पोलिसांना मिळाल्याने सर्वांची धावपळ उडाली होती. फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक शिवराम वायगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी फौजफाटा घेऊन आयआयटी व अभियांत्रिकीच्या इतर वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुखरूप कॅम्पसबाहेर काढले. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने संपूर्ण गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात शोध घेतला. पण काहीच सापडू शकले नाही. त्यामुळे येथे बॉम्ब असल्याचा तो ई-मेल फुसका बार ठरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी पहाटे ४ वाजता फर्मागुडी आयआयटीमध्ये बॉम्ब असल्याची मेल येथील ईमेलवर आली झाली. सकाळी १०.३० वाजता आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी फोंडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार उपअधीक्षक शिवराम वायगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी फौजफाटा घेऊन गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ दाखल झाले. पोलिसांनी त्वरित आयआयटी कॅम्पसमध्ये असणाऱ्या विध्यार्थ्यांना बाहेर काढले.
त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने सर्वत्र शोध घेतला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी शुभंम नाईक, मामलेदार राजेश साखळकर, फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक शिवराम वायगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर, अग्निशमन दलाचे अधिकारी अजित कामत, सुशील मोरजकर व गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. मात्र दुपार पर्यंत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला काहीच आढळून आले नाही.
फर्मागुडी येथील आयआयटी विध्यार्थ्यांची गुरुवारी दुपार २ वाजल्यापासून परीक्षा सुरु होणार होती. त्यामुळे सर्व विध्यार्थी पहाटे ४ ते ५ वाजे पर्यंत अभ्यास करीत असतात. परीक्षा देणारे विद्यार्थी दुपारी १ वाजता उठल्यानंतर कँटीन मध्ये जेवण करून परीक्षा देण्याच्या तयारीत होते. पण सकाळी ११ वाजता पोलिसांनी झोपलेल्या विध्यार्थ्याना उठवून बाहेर काढले. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने तपासणी केल्यानंतर फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी आयआयटीच्या सर्व विध्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश दिला. दुपारी १.३० वाजता त्यानंतर विध्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या.
दरम्यान देशात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने कॉल्स आणि मेसेजच्या माध्यमातून रेल्वे, विद्यालये, विमाने-विमानतळे, मंदिरांना बॉम्बने उडविण्याच्या तसेच अनेक सेलेब्रिटींना लक्ष्य करत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील विविध यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. आयआयटी कॅम्पसमधील घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून कुणा विद्यार्थ्याने आगळिक तर केली नाही ना ? या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. सध्या पोलीस त्या ईमेलचा स्त्रोत तपासण्यात गुंतले आहेत.