अभ्यासासाठी ताडोबा व्याघ्र क्षेत्रातून पक्षी सोडल्याचे स्पष्ट
कारवार : अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले गिधाड कारवार शहरात रविवारी सकाळी दिसून आले. कारवारसारख्या संवेदनशील भागात गिधाड दिसून आल्याने सर्वत्र भीतीचे व कुतूहलचे वातावरण होते. मात्र, या गिधाडाला अभ्यासासाठी जिपीएस उपकरण बसवण्यात आल्याचे तपासाअंती समजले.
कारवारच्या कोडीभाग येथील नदीवाडा परिसरात गळ्यात छोटे चौकोनी यंत्र, पाठीवर यंत्र, दोन्ही पायांना रिंगसारखे जिपीएस यंत्र बसवलेले जंगली गिधाड आढळून आले. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गिधाडाचा फोटो काढला असता त्याच्या अंगावर असलेल्या उपकरणावर कोड पद्धतीची माहिती होती. वन अधिकारी, पोलीस व गुप्तचर यंत्रणा याबाबत शोध घेऊ लागली. मात्र, त्याचवेळी कारवारच्या वन अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र संरक्षित प्रदेशातील एका शास्त्रज्ञाने संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गिधाडाबाबतचा असलेला संभ्रम दूर झाला.
महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र संरक्षित प्रदेशातील संशोधन संस्थेच्या डॉ. अमित नावाच्या अधिकाऱ्याने कारवारच्या डीसीएफ रविशंकर याला फोन करून संपर्क साधला. आपल्या देखरेखखाली असलेले एक गिधाड कारवारमध्ये आल्याची माहिती दिली. गिधाडाचे प्रजनन वाढविण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी ताडोबा व्याघ्र संरक्षित प्रदेशातील संशोधन संस्था आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्यामार्फत गिधाड प्रजनन कार्यक्रम हाती घेतला आहे. चार महिन्यांपूर्वी पाच गिधाडांना ट्रॅकिंग जीपीएस बसवून ताडोबा जंगलातून सोडण्यात आले. या पक्षाला खाद्य म्हणून कोंबडी किंवा मटणाचे तुकडे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन त्या अधिकाऱ्याने केले आहे.
कारवारमध्ये आलेल्या गिधाडाच्या पायात जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवली आहे. पायाला जोडलेल्या अंगठीवर ‘बीएनएचएस’ असे लिहिलेले आहे. आमच्याकडे हत्ती, कासव आणि सापही अशा प्रकारे ट्रॅक करण्यात आले आहेत. वाघ आणि बिबट्यांवर स्थापित केलेल्या ट्रॅकिंग सिस्टमची उदाहरणे पाहिली आहेत. काहीवेळा रशियामधूनही जिपीएस असलेले पक्षी उडत येतात, असे कारवारचे डीसीएफ रविशंकर यांनी सांगितले.