चांगले गुरु लाभणे हे मोठे भाग्य : नयना आपटे

मडगावात भिकू पै आंगले जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
13th November, 12:35 am
चांगले गुरु लाभणे हे मोठे भाग्य : नयना आपटे

नावेली : चांगले गुरु लाभणे हे मोठे भाग्य आहे. मला भिकू पै आंगले यांच्यासारखे महान गुरू लाभले. त्यांनी मला खूप शिकवले. त्यांचे शुभाशीर्वाद मला मिळाले हे माझे भाग्य आहे. असे उद्गार नाट्य कलाकार नयना आपटे यांनी रवींद्र भवन मडगाव येथे काढले.

ज्येष्ठ शिक्षण कर्मी, नाट्यकर्मी आणि शिक्षक स्व. भिकू पै आंगले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मडगाव रवींद्र भवन येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

नयना आपटे म्हणाल्या की, नाटकात अभिनय करताना तुमच्या जवळ काही नसेल तरी चालेल परंतु अभिनय क्षमता हवी. काम करण्याची क्षमता असेल तर चंद्रकांत गोखले यांच्यासारखे कलाकार वयाच्या ८५ वर्षांपर्यंत काम करू शकतात. असेही नयना आपटे यांनी सांगितले.

प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित ‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकाचा पहिला प्रवेश सादर झाला. डॉ. व्यंकटेश हेगडे (पराशर), नयना आपटे (सत्यवती), कपिल नायक (राजा देवव्रत), हेमंत आंगले (धीवर), चंदू पै काणे (चंडोल), योगन कोसंबे (प्रियदर्शन) यांनी आपल्या जिवंत अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

भिकू पै आंगले यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलेल्या अक्षदा पुराणिक तळावलीकर, पृथा कुंकळ्येकर, युगा सांबारी, डॉ. प्रदीप बोरकर, ऋतुजा रायकर, आश्र्वेक शानभाग यांनी सवेश नाट्यसंगीताच्या दमदार अभिनयाच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने मोहून टाकली.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचा प्रवेश सादर करण्यात आला. यात डॉ. प्रदीप बोरकर व साथी कलाकारांनी सहभाग घेतला.

सुरुवातीला ‘दामोदरा नमन पायी तुझ्या’ ही नांदी सादर करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव शिंक्रे यांनी केले. आभार महेश पै काणे यांनी मानले.

नयना आपटे यांचा सत्कार

नयना आपटे यांचा उद्योजक अवधूत तिंबलो यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिलीप धारवडकर, प्रवास नायक यांच्या हस्ते कलाकार तसेच पडद्यामागील कलाकारांना मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


हेही वाचा