बांबोळी राष्ट्रीय महामार्गानजीक कंटेनर कलंडला, चालक सुखरूप

कंटेनरमध्ये वॉशिंग मशीन, एसी या सारखी उपकरणे असल्याची चालकाने दिली माहिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th November, 01:06 pm
बांबोळी राष्ट्रीय महामार्गानजीक कंटेनर कलंडला, चालक सुखरूप

पणजीः बांबोळी राष्ट्रीय महामार्गानजीक एक कंटेनर कलंडल्याची घटना मंगळवारी सकाळी ८. ३० च्या सुमारास घडली असून अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहे. या कंटेनरचा चालक सुखरूप असून या अपघाताविषयी चालक दिनेश याच्याकडून मिळलेल्या माहितीनुसार या कंटेनरला एका कारने हुलकावणी दिल्याने त्या कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर रस्त्यालगत कलंडला. 

या कंटेनरमध्ये वॉशिंग मशीन, एसी या सारखी उपकरणे असून हा सर्व माल दिल्ली येथे नेण्यात येत होता. सदर कंटेनरमध्ये चालक एकटाच असून त्याच्यावर दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या अपघातात कंटेनरचे नुकसान झाले आहे. 

सध्या राज्यात रस्ते अपघाताच्या घटना दिवसागणिक वाढत असून  बहुतांशी घटना ह्या वाहतूक नियमांचे पालन न केल्यानेच घडत आहेत. सोमवारी जुने गोवे येथे कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वार जखमी  झाला होता. एका सर्वेक्षणानुसार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या २९५ दिवसांत २,०९८ अपघात, तर २२६ अपघाती मृत्यूंची नोंद झाल्याचे दिसून आले आहे. यावरून दररोज सरासरी ७ अपघात, तर ३१ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे.

मुक्या जनावरांनाही फटका- 

भरधाव वेगाने गाड्या हाकणाऱ्या वाहन चालकांचा फटका मुक्या जनावरांनाही बसला आहे. करासवाडा म्हापसा येथे रेतीवाहू ट्रकची रस्त्यावरील म्हशींना धडक बसून झालेल्या अपघातात ४ म्हशींचा मृत्यू झाला तर ४ म्हशी जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर घडली होती. या घटनेमुळे  येथील वाहतूक देखील काही काळ खोळंबली होती. तर मागच्या आठवड्यात मालपे -पेडणे या ठिकाणीसुद्धा भरधाव वाहनांची धडक बसून २ गायीचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा