नोकरी घोटाळा; कोट्यवधींना लुटलेल्या श्रुती प्रभूगावकरची चौकशी सुरू

संशयित भाजप कार्यकर्ता असल्याचे झाले उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 01:15 pm
नोकरी घोटाळा; कोट्यवधींना लुटलेल्या श्रुती प्रभूगावकरची चौकशी सुरू

पणजी : सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून अनेकांना सुमारे १.२१ कोटींना गंडा घातल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित श्रुती प्रभूगावकर या पर्वरी येथील महिलेला ताब्यात घेऊन फोंडा पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे. श्रुती ही प्रदेश भाजपची कार्यकर्ता असून, पक्षाच्या पर्वरीतील वेगवेगळ्या कार्यक्रमांत तिने सहभाग घेतल्याचे समोर आले आहे.

फोंडा पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी​ ज्या योगेश शेणवी कुंकळ्ळीकर या शिक्षकाला अटक केली आहे, त्याच्याकडून ही रक्कम श्रुती हिला पोहोचली असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्यांच्या अनेक टोळ्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. यापूर्वी पूजा नाईक, दीपाश्री सावंत यांची प्रकरणे प्रकाशझोतात आल्यानंतर आता श्रुती प्रभूगावकर हिचे प्रकरण उघडकीस आले आहे. श्रुती प्रभूगावकर आणि योगेश शेणवी कुंकळ्ळीकर या दोघांनी अनेकांना सरकारी नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून सुमारे १.२१ कोटींची रक्कम उकळली. एका शाळेत शिक्षक असलेल्या कुंकळ्ळीकर याने ही रक्कम श्रुती हिच्यापर्यंत पोहोचवली. या प्रकरणात कुंकळ्ळीकरला अटक झाल्यानंतर श्रुतीचे सत्य समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, फोंडा पोलीस श्रुती हिची चौकशी करीत असून, तिला लवकरच अटक होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा