पेडणे : धारगळमध्ये सनबर्न फेस्टिवल होऊ देणार नाही : आमदार प्रवीण आर्लेकर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th November 2024, 04:36 pm
पेडणे : धारगळमध्ये सनबर्न फेस्टिवल होऊ देणार नाही : आमदार प्रवीण आर्लेकर

पेडणे: पेडणेच्या जनतेने आपणास निवडून दिले आहे, जनतेला हवे असलेलेच निर्णय आपण घेऊ. त्यामुळे धारगळ तसेच पेडण्यात सनबर्न होऊ देणार नाही असे पत्रकार परिषद घेत स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले. वेळप्रसंगी लोकांसोबत रस्त्यावर उतरून सनबर्नचे आयोजन ठप्प करू असे ते म्हणाले. मालपे येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपण कधीही या प्रकारचे फेस्टिवल धारगळ किंवा पेडण्यात  व्हावे म्हणून आग्रह केला नाही. याबाबत आपणास कोणतीही पूर्वकल्पना देखील देण्यात आली नाही. काल रात्री सनबर्नच्या संकेतस्थळावर धारगळचे नाव पाहिले व आपणास धक्का बसला असे ते यावेळी म्हणाले.  यावेळी व्यासपीठावर मोपाचे सरपंच सुबोध महाले, धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, धारगळचे माजी सरपंच तथा पंच सदस्य अनिकेत साळगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, शिक्षक  देवानंद गावडे तसेच उद्योजक न्हानु हरमलकर आदी उपस्थित होते.

किनारपट्टी भागात याप्रकारच्या म्युझिक फेस्टिवलचे आयोजन ठीक आहे पण धारगळ किंवा पेडण्यात ते आयोजित करण्याचा सरकारचा काय हेतु ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर सरकारला यातून महसूल प्राप्तीची अपेक्षा असेल तर तो किनारी भागात घेण्यात यावा, पण धारगळमध्ये तो होऊ देणार नाही असे आमदार आर्लेकर म्हणाले. येथील संस्कृतीचे जतन करणे एक लोकप्रतिनिधी या नात्याने आपले कर्तव्य आहे व ते आपण पार पाडणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. 

पेडण्याला सांस्कृतीक वारसा लाभला आहे. सनबर्नच्या आयोजनामुळे येथील संस्कृतीला धक्का बसेल असे मोपाचे सरपंच सुबोध महाळे यांनी म्हटले. आमदारांना आपला पाठिंबा असून फेस्टिवलला विरोध करण्यासाठी जनतेसोबत  रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले. माजी सरपंच प्रदीप नाईक यांनी पंचायतीकडे ना हरकत दाखला आलेला नाही तसेच कोणतीही  कागदपत्रे देखील आली नाहीत मग सरकारने परस्पर या म्युझिक फेस्टिवलला परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित केला. 

पेडणे तालुका नागरिक समितीचे भारत बागकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना धारगळमध्ये प्रस्तावित असलेला सनबर्न म्हणजे विनाशाची नांदी असल्याचे म्हटले . सनबर्नमुळे येथे अमलीपदार्थ, गुन्हेगारी व वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी म्हटले. या प्रश्नावर लोकप्रतिनिधी व सामान्य लोकांनीही या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे मत त्यांनी व्यक्त केले.  



हेही वाचा