सुंगटा, खुबे, इसवणाच्या तुलनेत बांगड्यांचे उत्पादन जास्त

एलईडी मच्छीमारीचा बसतोय फटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November 2024, 12:15 am
सुंगटा, खुबे, इसवणाच्या तुलनेत बांगड्यांचे उत्पादन जास्त

पणजी : राज्यात इसवण आणि शिंगाला (कॅटफिश) सारख्या मोठ्या माशांपेक्षा बांगड्यांचे उत्पादन जास्त होते. एलईडी मासेमारीचा याला फटका बसला आहे. मोठे मासे एलईडी वापरणाऱ्या ट्रॉलरकडे वळतात, असे मच्छीमारांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत राज्यात मासे मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुन्हा बांगड्यांची संख्या वाढली आहे. २०२१ - २२ मध्ये राज्यातील एकूण मत्स्य उत्पादन १ लाख ११ हजार टन होते. त्यानंतर २०२२-२३ मध्ये १ लाख १६ हजार टन मत्स्य उत्पादन झाले. २०२३ - २४ मध्ये मत्स्य उत्पादन १ लाख ४० हजार टनांवर पोहोचले. पंधरा वर्षांपूर्वी २००९-१० मध्ये मत्स्य उत्पादन ८६ हजार टन होते. मत्स्य उत्पादनात वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

यामुळे पुन्हा बांगड्यांचे उत्पादनही वाढते. २०२१ -२२ या आर्थिक वर्षात बांगड्यांचे उत्पादन ३२९७० टन होते. यानंतर २०२२-२३ मध्ये ४४०१९ टन होते. २०२३ - २४ मध्ये बांगड्यांचे उत्पादन ५१,७९४ टन होते. बांगड्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

इतर माशांच्या तुलनेत गोव्यात बांगड्यांचे प्रमाण जास्त आहे. यातून पुन्हा एलईडी मच्छिमारीचा फटका बसतो, असे गोंयच्या रापणकारांचो एकवोटचे प्रमुख ओलांसिओ सिमोईस यांनी सांगितले.

बाहेरच्या राज्यातून आलेल्या ट्रॉलर्समुळे आता मोठे मासे मिळत नाहीत. एलईडी मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. पारंपरिक मच्छिमारांना याचा फटका बसला आहे. एलईडी दिवे असलेल्या ट्रॉलरकडे इसवणसारखे मासे आकर्षित होतात. यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा, असे मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी सांगितले. 

हेही वाचा