जिल्हा निबंधकांना बदलण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
पणजी : जिल्हा निबंधकांना बदलण्याची अशोक नाईक गटाची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळल्याने गोमंतक भंडारी समाजाच्या कामकाजाची चौकशी सध्याचेच जिल्हा निबंधक करणार आहेत. जिल्हा निबंधकांना बदलण्याची मागणी करणारा अशोक नाईक गटाचा अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळला.
उपेंद्र गावकर गटाचे वकील अॅड. कार्लोस फेरेरा यांनी ही माहिती दिली. जिल्हा निबंधकांकडून कारणे दाखवा नोटीस मिळाली नसल्याचाही दावा उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच बाजू मांडण्यासाठी अर्जदारांतर्फे वेळ मागण्यात आली. पुन्हा कारणे दाखवा नोटीस जारी केल्यानंतर दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत. अॅड. कार्लोस फेरेरा यांनी ही माहिती दिली.
दरम्यान भंडारी समाजाची निवडणूक प्रक्रिया अद्याप जैसे थे आहे. जिल्हा निबंधकांसमोर निवडणूक प्रक्रियेबाबत सोमवारी सुरू झालेली सुनावणी मंगळवारी सायंकाळी पुन्हा सुरू होणार आहे. मागील सोमवारी (४ नोव्हेंबर रोजी) भंडारी समाजाच्या निवडणुकीत घमासान झाले होते. अशोक नाईक गटाच्या देवानंद नाईक यांनी निवडणुकीत आपले पॅनल विजयी झाल्याचा दावा केला होता.