९२.६० टक्के बोली लावत जिंकला लिलाव
पणजी : कोडली येथील खाण पट्टा जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने ९२.६० टक्के बोली लावत मंगळवारी स्वत:च्या ताब्यात घेतला. होंडा येथील खाण पट्ट्यासाठी बुधवारी, तर कुर्पे-सुळकर्णेतील खाण पट्ट्यासाठी गुरुवारी लिलाव होणार असल्याची माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
कोडली, होंडा आणि कुर्पे-सुळकर्णेतील खाण पट्ट्यांच्या लिलावासाठी देशभरातील अनेक कंपन्यांनी निविदा जारी केल्या होत्या. प्रत्येक खाण पट्ट्यासाठी सर्वाधिक बोली लावलेल्या पाच कंपन्यांसाठी सरकारने अंतिम लिलाव ठेवला होता. त्यानुसार मंगळवारी कोडली येथील खाण पट्ट्यासाठी लिलाव झाला. या लिलावासाठी जेएसडब्ल्यू स्टीलसह जीव्हीपीआर, एमएसपीएल, मांडवी रिव्हर पॅले्ट्स आणि किलोस्कर अशा पाच कंपन्या पात्र ठरल्या होत्या. त्यात जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने सर्वाधिक ९२.६० टक्के बोली लावत कोडली येथील खाण पट्टा आपल्या ताब्यात घेतला आहे. होंडा आणि कुर्पे-सुळकर्णे या दोन खाण पट्ट्यांसाठीही बुधवार आणि गुरुवारी लिलाव होणार असल्याचे गाड यांनी सांगितले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सरकारने डिचोली, शिरगाव-मये, मोंते दी शिरगाव, काले, अडवलपाल-थिवी, कुडणे-करमळी, कुडणे, थिवी-पीर्ण आणि सुर्ला-सोनशी अशा नऊ खाण पट्ट्यांचा लिलाव केला होता. त्यातून सरकारला ५५.२७ कोटी मिळाले आहेत. त्यानंतर गेल्या जूनमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य भूगर्भ मंडळाच्या पहिल्याच बैठकीत आणखी तीन खाण पट्ट्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार खाण खात्याने कोडली, होंडा आणि कुर्पे-सुळकर्णे या तीन पट्ट्यांचा लिलाव करण्याचे निश्चित करून त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे.