४२ कोटी खर्चून उभारलेल्या चिंबल उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन
पणजी : पर्वरी उड्डाणपुलाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. मडगाव वेस्टर्न बायपास डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या कामांमुळे लोकांची गैरसोय होत असल्याची मला जाणीव आहे, पण चांगल्या भविष्यासाठी लोकांनी थोडे सहन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
चिंबल येथील राष्ट्रीय महामार्गावरील उजव्या बाजूच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कैकर, चिंबलचे सरपंच संदीप शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चिंबल राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मुदतीनुसार दुपारी तीनपर्यंत काम पूर्ण करून सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. कार्तिकी एकादशी हा शुभ दिवस असल्याने पुलाच्या उद्घाटनाची माहिती देण्यासाठी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांना सकाळी ११ वाजता फोन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चिंबल उड्डाणपुलाचा एक टप्पा ४२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. चिंबल पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. खालून वाहतूक रोखून काम सुरू करता येत नसल्याने दोन्ही दिशेने पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुलाची रिबन कापल्यानंतर रुग्णवाहिकेला वाट देण्यासाठी मुख्यमंत्री मंचावरून बाजूला गेले. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णवाहिका उड्डाण पुलावरून गेल्याने किमान ८ ते १० मिनिटे वाचली असतील.
मुख्यमंत्र्यांमुळे पूल पूर्ण : रुडॉल्फ
या मतदारसंघाचा आमदार असताना या पुलासाठी दोनच खांब उभारण्यात आले होते. हा पूल तसाच राहणार होता पण भाजप सरकारने तो पूर्ण केला. मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले आणि मुख्यमंत्र्यांशिवाय हा पूल कधीच पूर्ण झाला नसता, असे सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी सांगितले.