फोंडा : दीपाश्रीचा मध्यस्थ संदीप परबला न्यायालयाने सुनावली ३ दिवसांची पोलीस कोठडी

वन खात्यात एलडीसीची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एकास घातला होता ५ लाखांना गंडा. तक्रारीवरुन केली होती म्हार्दोळ पोलिसांनी अटक.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th November, 10:56 am
फोंडा : दीपाश्रीचा मध्यस्थ संदीप परबला न्यायालयाने सुनावली  ३ दिवसांची पोलीस कोठडी

फोंडा : सरकारी नोकरी देण्याचे गाजर देत लोकांना लुबाडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दर दिवशी यात नवीन प्रकरणांची भर पडत असते. दरम्यान म्हार्दोळ पोलिसांनी खांडोळा येथेल एकाच्या तक्रारीवरून संदीप जगन्नाथ परब यास अटक करण्यात आली  संदीपने तक्रारदारास नोकरीचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घातला. दरम्यान म्हार्दोळ पोलिसांनी संदीपला आज फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

 दरम्यान समोर आलेल्या नवीन प्रकरणानुसार, विशाल गावकर (३३, खांडोळा-माशेल) यास संदीप परब ( तारीवाडा-माशेल) याने वनखात्यात एलडीसी पदाच्या नोकरभरती बाबत माहिती दिली. या नोकरीसाठी १४ लाख रुपये मोजावे लागतील असेही सांगितले. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात तक्रारदार विशाल गावकर याने संदिपकडे ५ लाख रुपये दिले. वेळ उलटून गेली तरीही नोकरी मिळाली नाही व पैसेही गेलेत या भावनेने निराश होत अखेर विशाल याने संदीप विरोधात तक्रार नोंदवली. दरम्यान ही रक्कम संदीपने दीपाश्रीकडे सुपूर्द केली होती अशीही माहिती समोर आली आहे. सध्या म्हार्दोळ पोलिसांनी  तक्रारीच्या आधारे फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हे नोंदवत संदीप परब यास अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. 

संदीप परब  दीपाश्री सावंत प्रकरणाशी संबंधित असून मागे त्यानेच म्हार्दोळ पोलीस स्थानकात दिपाश्री विरोधात ४४ लोकांची सुमारे ४ कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याची  तक्रार नोंदवली होती. तसेच संदीप दीपाश्रीचा मध्यस्थ म्हणूनही काम करत होता. म्हार्दोळ पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दीपाश्री सावंत हिने संदिपच्या मदतीने ४४ जणांना विविध सरकारी खात्यांत कनिष्ठ लिपिक, तांत्रिक साहाय्यक, स्टेनोग्राफर, अबकारी निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, एमटीएस तसेच इतर पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. तसेच सर्वाधिक रक्कम २० लाख, तर कमीतकमी ३ लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.