'तुम्ही खूप पावरफुल..' म्हणाले न्यायमूर्ती
नवी दिल्ली : कर्नाटकच्या हासन मतदारसंघाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यास सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. प्रज्वलने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत त्या अमानुष कृत्याचे व्हिडिओ रेकोर्डिंग केले होते. प्रज्वल रेवण्णा वासनाकांडाने अवघ्या देशात खळबळ उडवून दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच सदर प्रकार बाहेर आला.
प्रज्वल याने जामीन मिळावा यासाठी सर्वप्रथम कर्नाटक उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. येथून निराशा पदरी पडल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला. दरम्यान एकंदरीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज फेटाळून लावला.
प्रज्वलचे प्रकरण न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आले होते. त्याने वकील बालाजी श्रीनिवासन यांच्या माध्यमातून जामीन अर्ज दाखल केला. दरम्यान न्यायालयात रेवण्णाच्या वतीने अधिवक्ता मुकुल रोहातगीने युक्तिवाद करताना, 'रेवण्णा विदेशात होते, ते परत आले आणि आत्मसमर्पण केले. आता त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. खटला अनेक वर्षे चालू राहील. त्यासाठी त्यांना तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा असे म्हटले.दरम्यान यावर न्यायमूर्ती त्रिवेदींनी उत्तर देताना 'तुम्ही खूप ताकदवान आहात..प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जामीन देणे शक्य नाही. तसेच या याचिकेवर विचार करण्यास देखील न्यायालय उत्सुक नाही,' असे म्हणत याचिका फेटाळली.
यावर रोहातगी यांनी ते पुन्हा सहा महिन्यांत याचिका दाखल करू शकतील का याबाबत विचरणा केली. यावर 'त्याबद्दल काही ठोस सांगता येणार नाही' अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती त्रिवेदींनी दिली. अन्य एका प्रकरणात, प्रज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांनाही अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्याची आई भवानी रेवण्णा हिचेही नाव तक्रारीत आरोपी म्हणून आहे. तिलाही अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
दरम्यान कर्नाटकच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम नागप्रसन्ना यांनी रेवण्णा याच्या प्रकरणात महिलांसाठी असलेली त्याची दुय्यम भावना आणि वासनांधता स्पष्ट दिसून येते असे म्हंटले होते. त्याला जामीन मंजूर केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल असेही ते यावेळी म्हणाले होते. मे महिन्यात प्रज्वलला सीआयडी- एसआयटीने जर्मनीहून परतल्यानंतर बंगळुरू विमानतळावरून अटक केली होती. त्याने शोषण केलेल्या पीडित महिलांचे हजारोंच्या संख्येने अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर तो ३५ दिवस जर्मनीत लपला होता. हासन लोकसभा मतदारसंघातून त्याचा ४० हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला.